नवी दिल्ली – देशांत सर्वाधिक करोनाबाधित सापडणाऱ्या पाच राज्यांत सक्रिय बाधितांच्या संख्येत घट होताना गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. यात सर्वाधिक घट आंध्र प्रदेशात पाहायला मिळत असून तेथे गेल्या दोन आठवड्यात सक्रिय बाधितांच्या संख्येत 30 टक्के घट झाली.
आंध्र प्रदेशात 10 सप्टेंबरपर्यंत दररोज सुमारे 10 हजार बाधित सापडत असत. मात्र, सध्या ही संख्या आठ हजारपर्यंत खाली आली असून करोनामुक्तांची संख्या 10 हजारपेक्षा अधिक होत आहे. वाढीचा वेग महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. 2.5 टक्के होता तो आता 1.25 टक्क्यांवर पोहोचला आहे.
महाराष्ट्रात एका आठवड्यात सक्रिय बाधितांची संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत तीन लाखांवरून 2.75 लाखांवर पोहोचली आहे. तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात सक्रिय बाधित घटण्याचा वेग कमी असला तरी समाधानकारक आहे.
ही स्थिती देशातील चित्राप्रमाणेच आहे. गेल्या सहा दिवसांत बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. देशांत सक्रिय बाधितांची संख्या 17 तारखेला 10.17 लाख होती ती आता 9.66 लाखांवर पोहोचली आहे.
चाचण्या कमी केल्याचा परिणाम
नवे बाधित सापडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत असले तरी त्यामागे गेल्या काही दिवसांत चाचण्याचे प्रमाण कमी केले आहे, हे एक कारण आहे. सध्या सरासरी नऊ लाख 81 हजार चाचण्या दररोज घेतल्या जातात. दहा दिवसांपूर्वी हे प्रमाण 10.94 लाख एवढे होते.