बीजिंग – चीनने करोनावर पूर्ण विजय मिळवला असल्याचे सांगितले जात असले तरी त्या देशातून अजून करोना पूर्ण हद्दपार झालेला नाही हे आता स्पष्ट होत आहे. तेथील अनेक प्रांतांमध्ये करोनाच्या रोज नवनवीन केसेस आढळून येत आहेत. काल रविवारी एका दिवसात विविध ठिकाणी करोनाच्या एकूण 32 केसेस आढळून आल्या आहेत. त्यातील 16 जण विदेशातून चीनमध्ये परत आलेल्यांपैकी आहेत.
सिचुआन प्रांतातील 11 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर दोन ग्वांगडॉंग प्रांतातील आहेत. मंगोलिया स्वायत्त प्रदेशातही तीन जणांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्या वुहान प्रांतातून करोना पसरल्याचे मानले जाते तेथे मात्र अजून एकही नवीन पेशंट आढळून आला नसला तरी तेथील 320 जणांना अजून क्वारंटाइन ठेवण्यात आले आहेत. चीनमध्ये एकूण 83 हजार 17 जणांना करोनाची लागण झाली होती. त्यातील आता केवळ 76 पेशंटवर उपचार सुरू आहे.