सातारा – पोवईनाका व संगमनगर या दोन ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनी फुटल्याने रविवारपासून शाहूपुरी व परिसरात पाण्याचा ठणठणाट आहे. शाहूपुरी प्रमाणेच सदरबझार आणि गोडोली परिसरातही पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.
शाहुपुरी परिसरात जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, अनेकदा शाहूपुरीकरांना पाइप फुटणे, लिकेज न सापडणे आदी कारणांमुळे पाण्यापासून वंचित राहवे लागत आहे. त्यातच रविवारी सकाळी पोवईनाका परिसरात ग्रेड सेपरेटरच्या कामावेळी पाइप लाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्याचप्रमाणे संगमनगर येथे सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या दाबामुळे मुख्य पाइपलाइन फुटली आहे.
याही पाइपच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. दोन ठिकाणी मुख्य पाइपलाइनच फुटल्याने त्याचा विपरित परिणाम शाहूपुरी व परिसरातील पाणी पुरवठ्यावर झाला आहे. रविवार व सोमवार सलग दोन दिवस शाहूुपुरीकरांना पाणी पुरवठा झाला नाही. परिणामी शाहूपुरीत पाण्याचा ठणठणाट असून नागरिक संतप्त झाले आहेत. मंगळवारी शाहूपुरीतील पाणी पुरवठा बंद असतो. त्यामुळे सलग तीन दिवस शाहूपुरीकरांना पाणी मिळणार नसल्याची शक्यता आहे.
शाहुपुरीप्रमाणेच सदरबझार आणि गोडोली परिसरातही पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. जीवन प्राधिकरणाच्यावतीने याबाबत उपाययोजना करुन तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती शाहूपुरी विभागाचे शाखा अभियंता जंगम यांनी दिली.