एसटी महामंडळाकडून वावरहिरे गावासाठी टॅंकरची सोय

वावरहिरे व कानकात्रेवाडी गावे महामंडळाकडून दत्तक
व्यथा तुमची, जाण आमची
दुष्काळी माण व खटावमधील जनतेची गरज ओळखून एसटीने काही गावांसाठी टॅंकरची सोय केली आहे. महामंडळाने पुरविलेल्या टॅंकरवर “व्यथा तुमची, जाण आमची’, “तुमचीच लालपरी’ असे घोषवाक्‍य असलेला फ्लेक्‍सबोर्ड लावल्याने ग्रामस्थांनीही महामंडळाच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

गोंदवले – लाल परीने जाणली दुष्काळी लोकांची तहान प्रवाशांना अविरत सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत दुष्काळी गावासाठी टॅंकरने मोफत पाणीपुरवठा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. एसटीच्या सातारा विभागामार्फत माण तालुक्‍यातील वावरहिरे या गावासाठी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

माण तालुक्‍यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असल्याने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक भावनेतून एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. दुष्काळी भागातील जनतेला मोफत पाणीपुरवठा करण्यासाठी सातारा विभागाच्यावतीने माण व खटाव तालुक्‍यातील अनुक्रमे वावरहिरे व कानकात्रेवाडी ही गावे दत्तक घेतली असल्याचे एसटी महामंडळाचे मुंबईचे कार्यकारी अभियंता विनीत कुलकर्णी यांनी सांगितले.

वावरहिरे याठिकाणी पहिल्या टॅंकरच्या पाणी वाटपाचा शुभारंभ करताना विनीत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी विभाग नियंत्रक सागर पळसुले, यांत्रिकी अभियंता अजितकुमार मोहिते, विभागीय अभियंता प्रियांका काशीद, दहिवडी आगार व्यवस्थापक मोनाली खाडे पाटील, कनिष्ठ अभियंता पुनम सुतार, वावरहिरे सरपंच चंद्रकांत वाघ, उपसरपंच तुकाराम जाधव, दत्ताञय पांढरे मधूकर अवघडे, मल्हारी जाधव, संदीप अवघडे उपस्थित होते. दरम्यान प्रवाशांच्या सेवेसाठी धावणारी महामंडळाची लालपरी दुष्काळी जनतेची तहान भागविण्यासाठी धावल्याने एसटीच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. तर सरपंच वाघ यांनी एसटी महामंडळाचे आभार मानले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×