मुदत संपली तरी ठेकेदार तिथेच

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पार्किंगच्या नावाखाली फाडल्या जाताहेत पावत्या

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी पार्किंग क्षेत्र उभारण्यात आले आहे. महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाने मिळकतीवर आणि काही मोकळ्या जागेवर पार्किंग धोरण राबवून ठेकेदार नियुक्‍तकेले होते. सद्यस्थितीला त्या ठेकेदारांची मुदत संपलेली आहे. मात्र प्रत्यक्षात अजूनही पार्किंगच्या नावाखाली पावत्या फाडण्याचे काम ठेकेदारांनी सुरूच ठेवले आहे. मुदत संपूनही वसुली होत असलेल्या ठेकेदारांवर कारवाई केली जात नाही? त्यामुळे कुणाच्या वरदहस्ताने ठेकेदार वसुली करत आहेत असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडून शहरातील मिळकतीचे संरक्षण करण्यात येते. तर मोकळ्या आरक्षित जागा भूसंपादन झाल्यानंतर या विभागाकडे हस्तांतर करण्यात आलेल्या आहेत. त्यातील महापालिकेच्या शाळा, दवाखाने, रुग्णालये, भाजी मंडई, प्रभागस्तरीय इमारती, नाट्यगृहे याशिवाय मोकळ्या जागेवर पार्किंगचे धोरण राबविलेले आहे. त्यानुसार महापालिकेने शहरात 23 ठिकाणी पार्किंगच्या जागा राखीव केल्या आहेत. त्या जागेवर पार्किंग करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत.

या ठिकाणी सुरु आहे लूट
महापालिकेच्या निगडी सेक्‍टर क्रमांक 23 मधील वाहतूकनगरी वाहनतळ या जागेचे पार्किंगसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराची मुदत संपलेली आहे. प्रत्यक्षात त्या जागेवरुन आजही पार्किंगची वसुली जोरदार सुरु आहे. तेथे येणाऱ्या नागरिकांकडून वाहनतळाचे शुल्क आकारले जाते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पार्किंगचीही मुदत संपली आहे. वाहनतळासाठी असलेल्या जागेवर वायसीएमच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. येथे वाहने लावण्यासाठी जागा ही उपलब्ध नाही. रुग्णालयाच्या आवारात इतरत्र वाहने उभी केली जातात. मात्र याठिकाणी छुप्या पद्धतीने वसुली सुरू आहे.

ठेकेदारांचे कर्मचारी खिशामध्ये बिलपुस्तिका ठेवतात. वाहनाचे शहराच्या बाहेरील पासिंग असेल तर त्याच्याकडून जबरदस्तीने वसुली करतात. यावरून अनेकवेळा परिसरामध्ये वादावादीचे प्रसंग झाले आहेत. तसेच पिंपरीतील क्रोमा रुग्णालयाशेजारी पार्किंगवरही व्यवसाय थाटला आहे. वाहनतळावर वाहने पार्क केल्यानंतर पावती फाडल्याशिवाय गाडी बाहेर जावू दिली जात नाही. तसेच निगडीच्या दुर्गा देवी टेकडीलगत अप्पू घर परिसरात देखील पार्किंगच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरु आहे. रहाटणी येथील स्पॉट 18 या इमारती खालील बीआरटीएस वाहनतळावर देखील वसुली जोरात सुरु आहे.

अधिकाऱ्यांकडून डोळेझाक
दरम्यान, महापालिकेच्या भूमि व जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्‍त, प्रशासन अधिकारी, तेथील प्रभाग अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असूनही याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करण्यात आली आहे. शहरात पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली नागरिकांची लूट थांबविण्यासाठी महापालिका आधिकाऱ्यांनी पावले उचलणे आवश्‍यक आहे. मात्र याबाबत महापलिकेतील सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्षासह, अधिकारी, पदाधिकारी व सर्वपक्षीय नगरसेवकांनी तोंडावर बोट ठेवले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी महापालिकेच्या पैशातून झोळी भरण्याचा सपाटा लावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.