पुणे : अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम राम नवमी किंवा अक्षय तृतीयेला सुरू करण्यात येईल. मात्र त्याची नेमकी तारीख ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत ठरवण्यात येईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर उभारण्यासाठी 15 सदस्यांचे ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर स्वामी गोविंद देवगिरी महाराज दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट उभारल्याबद्दल मी मोदी सरकारचे अभिनंदन करतो. प्रयागराज येथे झालेल्या बैठकीनुसार मंदिर निर्मितीला यावर्षी राम नवमी (दोन एप्रिल) किंवा अक्षय्य तृतीयेला (26 एप्रिल) सुरवात करण्यात येईल. अर्थात यातील तारीख ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत ठरवण्यात येईल. अयोध्येत राममंदिर उभे रहावे, अशी अनेक लोकांची इच्छा होती. ते केवळ रामाचे स्मारक नसेल तर देशाचे स्वाभीमान चिन्ह असेल, असे ते म्हणाले.
येत्या दोन वर्षात बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे सांगून रामजन्मभूमी चळवळीतील योगदानाबद्दल त्यांनी करसेवक आणि विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांचे त्यांनी आभार मानले.