fbpx

पुणे : विमानाच्या सतत घिरट्यांमुळे नागरिक धास्तावले

पुणे- धायरी, आंबेगाव आणि खडकवासला परिसरात शनिवारी सकाळी एक विमान सातत्याने घिरट्या घालत होते. अतिशय कमी उंचीवरुन घिरट्या घालणाऱ्या या विमानामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. याबाबत अधिक माहिती घेतली असता ते लष्कराचे प्रशिक्षण विमान असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हवाई दल किंवा लष्कराकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.

खडकवासला परिसरात शनिवारी सकाळपासूनच हे विमान अतिशय कमी उंचीवरून उड्डाण करत होते. विमान त्याच परिसरात सातत्याने घिरट्या घालत असल्याने हा नेमका काय प्रकार आहे, असा प्रश्‍न अनेकांना पडला होता. मात्र, अकरा वाजल्यानंतर हे विमान पुन्हा दिसले नाही.  परिसरात नेहमीच सुखोई लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, अथवा प्रवासी विमान उड्डाण करतात.

मात्र, इतक्‍या कमी उंचीवरून आकाराने जवळपास प्रवासी विमानाइतके मोठे विमान सातत्याने घिरट्या घालत असल्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि काहीशी भीती देखील होती. या विमानाचा आवाजही धडकी भरवणारा होता. त्यामुळे नागरिक घराबाहेर येऊन किंवा गच्चीवर जाऊन हे विमान पाहात होते. सुमारे दोन तास हे विमान याच परिसरावर घिरट्या घालत असल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.

खडकवासला परिसरातून आज कोणत्याही प्रवासी विमानाने उड्डाण केले नाही. परिसरातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीचे (एनडीए) वैमानिक स्वत:चे प्रशिक्षण केंद्र आहे.  त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
– कुलदीप सिंह, संचालक, पुणे विमानतळ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.