नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी या 16 जुलैपासून उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या या दौऱ्यात विविध जिल्हांमध्ये जाऊन तेथील कॉंग्रेसच्या संघटनात्मक बांधणीबाबतही चर्चा करणार आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यासंबंधात त्यांनी दिल्लीतही काहीं बैठका आयोजित केल्या आहेत.
कॉंग्रेसच्या उत्तरप्रदेशातील नेत्यांबरोबर त्यांनी आज दिल्लीत चर्चा केली. यावेळी त्यांनी योगी सरकारच्या गैरकारभाराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा संदेश आपल्या पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. आपल्या उत्तरप्रदेश दौऱ्यावर त्या शेतकरी व युवक प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.
कॉंग्रेसकडून उत्तरप्रदेशात लवकरच उमेदवार निवड प्रक्रियाही सुरू केली जात आहे. बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी उत्तरप्रदेशातील निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याची शक्यता फेटाळून लावल्याने कॉंग्रेसला या राज्यात स्वबळावरच लढावे लागणार आहे.
त्यासाठी प्रियांका गांधी यांना बरीच तयारी करावी लागणार आहे. त्यांच्याकडेच उत्तरप्रदेश शाखेचा संपूर्ण कार्यभार सोपवण्यात आला आहे.