लोणावळा -लोणावळा नगर परिषदेची आगामी निवडणूक ही राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून स्वबळावर लढवली जाणार आहे. गुरुवारी झालेल्या लोणावळा शहर कॉंग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती लोणावळा शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली आहे.
यदाकदाचित भविष्यात महाविकास आघाडीमधून निवडणूक लढविण्यासंदर्भात काही सूचना हाय कमांडकडून आल्याच तर लोणावळ्यात कॉंग्रेस हा संख्याबळाच्या दृष्टीने महाविकास आघाडीमधील सर्वांत मोठा पक्ष असल्याने आगामी निवडणूक ही कॉंग्रेसच्या अटी-शर्तीनुसारच होईल, असेही या वेळी जाहीर करण्यात आले. लोणावळ्यातील हॉटेल चंद्रलोक याठिकाणी लोणावळा शहर कॉंग्रेस कमिटी बैठक पार पडली. या वेळी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर, शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, निवडणूक निरीक्षक नासिर शेख, महिला शहराध्यक्षा पुष्पा भोकसे, सेवादल अध्यक्ष सुनील मोगरे, हाजी अब्बास इब्राहिम खान, बाबूभाई शेख, रवी सलोजा, सुबोध खंडेलवाल, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, माजी नगरसेविका पूजा गायकवाड आदींसह कॉंग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लोणावळा शहर कॉंग्रेसची भूमिका मांडण्यात आली.
मागील काळात लोणावळा शहर कॉंग्रेसचे काही नेते आणि नगरसेवक कॉंग्रेसला हात दाखवून राष्ट्रवादीमध्ये गेले. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेसकडून सांगण्यात आले की, लोणावळा शहरात कॉंग्रेस पक्षाने ज्यांना मोठे केले, ज्यांना पद दिली, ते कॉंग्रेसला सोडून गेले. स्वतःला नेते म्हणवणारे गेले असले तरी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि मतदार अजून जाग्यावरच आहे. मावळचे आमदार हे महाविकास आघाडीचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांना निवडून देण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन प्रचार केला. त्यांना मतदान केले. पण आमदारांना त्याचा विसर पडला आहे.
पुढील काही दिवसांत लोणावळ्यात कॉंग्रेस पक्षाची कार्यशाळा होणार आहे. त्याला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ऍड. यशोमती ठाकूर, सुनील केदार, संजय जगताप, संग्राम थोपटे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी शहर कॉंग्रेस कमिटीची काही पदे ही जाहीर केली. त्यात शहर कॉंग्रेस सरचिटणीस पदी सर्फराज शेख, सांस्कृतिक सेल पदी अश्विनी हारपुडे, शिक्षण व पालक सेल पदी यास्मिन अय्याज शिकीलकर, महिला उपाध्यक्ष पदी आसमा मणियार यांची निवड करण्यात आली.