कॉंग्रेस शहराध्यक्ष पदासाठी चुरस

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर होणार फेरबदल ः विविध नावांवर चर्चा

पिंपरी -आगामी महापालिका निवडणुकांच्या तोडांवर कॉंग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. पक्षामध्ये शहराध्यक्ष पदासाठी सध्या शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप पांढरकर, कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सचिव अशोक काळभोर आणि कामगार नेते कैलास कदम यांच्यात प्रामुख्याने चुरस आहे. विद्यमान अध्यक्ष सचिन साठे हे कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात, यावरही बऱ्याच बाबी अवलंबून आहेत.

महापालिका निवडणुका फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित आहेत. म्हणजे निवडणुकांसाठी अवघे पाच महिने उरले आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर पक्षबांधणी सुरू झाली आहे. नोव्हेंबर-2020 मध्ये शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिलेला आहे. परंतु अजूनही हा पदभार त्यांच्याकडे आहे.

त्यानंतर शहराध्यक्ष पदासाठी 22 ते 23 जणांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या. मात्र, अद्याप शहराध्यक्ष बदलाबाबत निर्णय प्रलंबित आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ बांधून पक्षबांधणी आणि पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या नवनेतृत्वाची कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला एकही जागेवर नगरसेवक निवडून आणता आला नव्हता.

त्याची जबाबदारी स्वीकारून त्या वेळी देखील साठे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून नवीन शहराध्यक्ष देण्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. दरम्यान, आता साठे यांना पक्षाने प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी देऊ केली आहे. त्यामुळे आता शहराध्यक्ष पदावर लवकरच कॉंग्रेसमधील जुन्या निष्ठावंतांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले दिलीप पांढरकर हे 25 ते 28 वर्षांपासून शहर कॉंग्रेससाठी काम करीत आहेत. त्यांनी शहर कार्यकारिणीवर सरचिटणीस, उपाध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. स्थानिक जनसंपर्क, गोतावळा आदींच्या जोरावर पक्षबांधणीसाठी चांगले काम करू शकतात, अशी कार्यकर्त्यांची भावना असून अनेक कार्यकर्ते उघडपणे व्यक्‍त करतात. कामगारनेते कैलास कदम नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विरोधी पक्षनेता म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

तथापि, त्याशिवाय, प्रदेश कॉंग्रेसमध्ये पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणारे अशोक काळभोर हे 1978 मध्ये इंदिरा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस, पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य या पदांवरही काम केले आहे. शहरातील स्थानिक प्रश्‍नांची जाण, नातीगोती, मोठा मित्र परिवार आदींच्या बळावर आपण पक्षाची ताकद शहरात वाढवू शकतो, असे काळभोर यांना वाटत आहे. एकंदरितच कॉंग्रेस शहराध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस रंगणार आहे.

मला प्रदेश कॉंग्रेसवर संधी मिळाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेससाठी दुसरा अध्यक्ष नेमावा, अशी मागणी आपण केलेली आहे. या पदासाठी बरेच जण इच्छुक आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाणारा, पक्षाची विचारधारा मानणारा अध्यक्ष हवा, असे आपण पक्षश्रेष्ठींना सुचविले आहे.

 – सचिन साठे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.