कॉंग्रेसने आता पंजाबमध्ये प्रभारीही बदलला

नवी दिल्ली  – कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पंजाबमध्ये आपला प्रभारीही बदलला. त्यानुसार, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांच्या जागी राजस्थानचे मंत्री हरिष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.

पंजाबमध्ये सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसच्या प्रदेश शाखेत मागील काही काळात मोठा गृहकलह झाला. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेदांमुळे पंजाब कॉंग्रेसमधील दुही उघड झाली. पंजाब कॉंग्रेसमधील पेच मिटवण्यासाठी प्रभारी या नात्याने रावत यांना अनेकदा हस्तक्षेप करावा लागला.

अमरिंदर यांचा विरोध असतानाही सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. काही दिवसांपूर्वी अमरिंदर यांना हटवून चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्या घडामोडींमध्ये रावत यांची भूमिका महत्वाची ठरली. पंजाबमधील पेचाच्या काळात रावत यांनी प्रभारीपदावरून मुक्त करण्याची कॉंग्रेस श्रेष्ठींना केलेली विनंतीही चर्चेचा विषय ठरली.

अर्थात, पुढील वर्षी होणाऱ्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांनी संबंधित विनंती केल्याचे स्पष्ट झाले. आता रावत यांना पंजाबच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.