नगर – आगामी कॅन्टोन्मेंट निवडणुकीत सर्वच्या सर्व 7 जागा जिंकून कॉंग्रेस आघाडीचा झेंडा फडकवला जाईल, असा विश्वास कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंके यांनी व्यक्त केला. भिंगार शहर कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री.साळूंके बोलत हाते. अध्यक्षस्थानी कॅन्टों.चे माजी उपाध्यक्ष तथा पक्षाचे शहर अध्यक्ष ऍड.आर. आर.पिल्ले होते.
गाव तेथे शाखा या पक्षाच्या अभियानाच्या नियोजनासाठी भिंगार येथे बैठक घेण्यात आली. यावेळी बोलतांना श्री.साळूंके यांनी आगामी कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मान्यता देत ही निवडणूक जिंकून घेऊ असा विश्वास व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल प्रगतीकडे जात असून, पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करु हा त्यांचा निर्धार लक्षात घेऊन पक्ष गाव तेथे अभियानातंतर्गत भिंगार शहरात 7 शाखा प्रभागावर करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी साळूंके यांचा कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागत महिला अध्यक्षा श्रीमती मार्गारेट जाधव यांनी केले. सभाध्यक्ष ऍड.पिल्ले यांनी भिंगार कॉंग्रेस कमिटी कार्याचा आणि कॅन्टोन्मेंट निवडणूक सद्यस्थितीचा अहवाल दिला. यावेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, आदिंची भाषणे झाली.