कॉंग्रेस आणि जेडीएसची कर्नाटकमधील आघाडी धोक्‍यात

सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मित्रपक्ष दुरावणार

बंगळूर: कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जेडीएसची आघाडी धोक्‍यात आली आहे. त्या राज्याच्या सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्यानंतर ते मित्रपक्ष दुरावण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार मंगळवारी कोसळले. त्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी कुमारस्वामी यांनी बुधवारी येथे त्यांच्या पक्षाची (जेडीएस) बैठक बोलावली. त्या बैठकीआधी पत्रकारांनी आघाडीच्या भवितव्याविषयीचा प्रश्‍न कुमारस्वामी यांना विचारला.

त्यावर ते उत्तरले, स्वपक्ष मजबूत करण्याला आमचे पहिले प्राधान्य आहे. आताच्या स्थितीत पुढे कसे जाता येईल आणि राज्यातील जनतेचा विश्‍वास कसा संपादन करता येईल याचा विचार आम्ही प्रथम करणार आहोत. त्यानंतर आघाडी कायम राहणार का, असे पत्रकारांनी आणखी खोदून विचारल्यावर ते म्हणाले, पाहूया काय होते ते. कॉंग्रेसची भविष्यातील योजना मला ठाऊक नाही. आम्ही आघाडीबाबत अजून काही ठरवलेले नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

कर्नाटकात मे 2018 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळता त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यामुळे कॉंग्रेस आणि जेडीएसने एकत्र येत सरकार स्थापन केले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीलाही ते पक्ष एकत्रितपणे सामोरे गेले. मात्र, त्या निवडणुकीत त्या आघाडीची मोठी पीछेहाट झाली. त्यामुळे त्या मित्रपक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली. आता राज्याची सत्ता गेल्यानंतर ती धुसफूस आणखीच वाढण्याची शक्‍यता आहे. त्यातून आघाडीत बिघाडी होऊन कॉंग्रेस आणि जेडीएस हे पक्ष पुन्हा एकला चलोचा नारा देतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)