राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदारांची अवस्था महाभारतातील ‘अभिमन्यू’ सारखी

जनते पुढे काही चालेना अन्‌ सरकार दाद देईना : ठाम भूमिका घेण्यात धजावत नाही

आमदार दिलीप मोहिते

रोहन मुजूमदार
पुणे – सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आमदार असूनही वारंवार सरकारचे उंबरठे झिजवूनही मंत्री दाद लागू देईना, अन्‌ जनतेला दिलेल्या आश्‍वासनांपुढे काही चालत नसल्याने खेड तालुक्‍याचे आमदार दिलीप मोहिते यांची अवस्था महाभारातील “अभिमन्यू’सारखी झाली आहे. एकीकडे जनतेच्या अन्‌ दुसरीकडे पक्षाच्या मंत्र्यांच्या “चक्रव्युहा’त अडकल्याने त्यांना बाहेर पडणे कठीण जात आहे. तर आपण वेगळी भूमिका घेवू, असे ते वारंवार सांगत असले तरी ठाम भूमिका घेण्यातही ते धजावत नसल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

 

खेड तालुक्‍यातील तहसीलदारांच्या पतीकडून धमकी मिळत असून मला पोलीस संरक्षण द्या तसेच तहसीलदार मलिदा लाटण्यात पटाईत असल्याने त्यांची तात्काळ बदली करा, अशी मागणी आमदार मोहिते यांनी सरकारकडे केली होती. मात्र, मंत्र्यांनी त्यांची ‘दाद’ लागू दिली नाही. तर ‘भामा आसखेड’ग्रस्तांच्या जमिनी लाटाणाऱ्यांची चौकशी करावी, अशी वारंवार मागणी केली. त्यातच भामा आसखेड आंदोलन चिघळले. त्यावेळीही त्यांनी मध्यस्थी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक लावतो उपोषण मागे घ्या, असे आश्‍वासन देवून उपोषण सोडवले होते. मात्र, अजित पवारांनी बैठक घेत पूर्वीचाच निर्णय कायम ठेवत आमदार दिलीप मोहिते यांचे आश्‍वासन व मागणीला ‘केराची टोपली’ दाखवल्याने आंदोलकांमध्ये आमदरांविरोधी वातावरण निर्माण झाले आहे.

 

त्यातच आंदोलन चिघळले व आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले त्यानंतर आंदोलक शांत असले तरी त्याचा ‘भडका’कधीही उडू शकतो याची खात्री आमदार मोहिते यांना असल्याने त्यांनी सरकारवरच ‘आसूढ’ ओढण्यात ‘दबाव तंत्रा’चा मार्ग स्वीकारला आहे.

 

 

ज्या तालुक्‍याला मंत्रीपद मिळाले त्या तालुक्‍याचा विकास होतो; मात्र त्या तालुक्‍याच्या आसपासचे तालुके आणखी दुर्लक्षित होतात, हे आजवर घडत आले आहे अन्‌ पुढेही घडत राहणार.सध्याच्या करोना काळात उपमुख्यमंत्री अजित पवार सोडले तर सगळे मंत्री आपल्या तालुक्‍यापूरता विचार करता, असा उल्लेख त्यांनी कोणत्या मंत्र्याचे नाव न घेता केला असला तरी त्यांचा संपूर्ण रोख हा आंबेगाव तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी तथा मंत्री दिलीप वळसे पाटलांवर होता, हे सांगयला काही ज्योतिषाची गरज नाही.

 

 

दरम्यान, कामगार विधेयकाबाबत जर ठोस भूमिका घेतली नाही तर कामगार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशार आमदार मोहिते यांनी दिला असून एकप्रकारे आंदोलनाद्वारे ते आपला रोष मंत्री वळसे पाटलांवर काढणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ‘बेबनाव’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 

  • वरिष्ठांशी सख्य नाही?
    खेड तालुक्‍याला मंत्रीपद मिळावे अशी मागणी नारायण पवार आमदार असल्यापासूनची आहे;मात्र वारंवार मंत्रिमंडळात खेडला डावले जाते याचे कोडे अद्यापही तालुक्‍यातील जनतेला उलगडलेले नाही. एकतर तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींचे वरिष्ठांशी सख्य नसावे, असाच एक अर्थ जनता काढत आहेत. आणि ते खरही म्हणावे लागेल. कारण सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही मागण्यांकडे थेट दुर्लक्ष केले जाते किंवा “हात’वर केले जातात याला काय म्हणायचे, असा सवालही उपस्थित होत आहे.

 

  • करोनाचा कहर अन्‌ उपाययोजनांचा दुष्काळ
    खेड तालुक्‍यात करोनाने उग्र रुप धारण केले आहे. काहीकेल्या करोनाचा फैलाव रोखण्यात अपयश येत आहे. त्यातच प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आमदार दिलीप मोहिते यांचे सुत जुळत नसल्याने किंवा प्रशासकीय अधिकारी त्यांचे ऐकत नसल्याने करोनाचा फैलाव रोखण्यात अपयश येत आहे. तर उपाययोजनांचा ‘दुष्काळ’ व प्रशासकीय यंत्रणेचा ‘ताळमेळ’ नसल्याचेच म्हणावे लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.