जिल्ह्यावासीयांची चिंता वाढली

मुंबई व इतर जिल्ह्यांमधून आलेल्यांकडून वाढला धोका

सातारा  (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले; परंतु मुंबई व इतर जिल्ह्यांमधून आलेले अनेक नागरिक करोनाबाधित आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना खीळ बसत आहे.

करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे राज्यातील सर्वाधिक प्रमाण सातारा जिल्ह्यात असले तरी शुक्रवारी रात्री व शनिवारी 77 रुग्ण वाढले. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. ग्रामीण भाग हिट लिस्टवर असल्याचे दिसते.

जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात राहिली होती; पण कराड तालुक्यात चिंता होती. चार दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा जास्त होते. शुक्रवारी व शनिवारी दिवसभरात रुग्णसंख्या वाढल्याने बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी झाले. मुंबई व इतर जिल्ह्यांमधून, परराज्यातून नागरिक जिल्ह्यात, विशेषत: ग्रामीण भागात येण्याचे प्रमाण वाढले आहे.

अधिकृत परवानगी घेऊन येत असलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन अथवा विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. त्यातून एका रुग्णामुळे साखळी निर्माण होण्याचा धोका कमी आहे. बाहेरून येत असलेले नागरिकच बऱ्यापैकी बाधित आढळून येत असल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे.

-नागरिकांची बेफिकिरी

गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही काही जण दररोज भिरकीट करत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी करोना संसर्गासाठी पोषक आहे. सायंकाळी ते सकाळी सात या वेळेत काही जण कुटुंबासह फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.