पुणे – शहरात बावधन परिसार “झिका’ विषाणूचा रुग्ण आढळला आहे. एडिस इजिप्ती डासामुळे हा आजार होतो. बावधन येथील 67 वर्षीय पुरुषाला या विषाणुची लागण झाली असून, सध्या हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून पुणे शहर तसेच बावधन परिसरात ताप रुग्ण सर्वेक्षण अधिक वेगवान करण्यात आले आहे.
पुण्यातील एका खासगी प्रयोगशाळेत 18 नोव्हेंबरला हा रुग्ण झिकाबाधित असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दि. 30 नोव्हेंबरला एनआयव्हीच्या तपासणीत हा रुग्ण झिकाबाधित आल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, हा रुग्ण दि. 16 नोव्हेंबरला जहांगीर रुग्णालयात ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा या कारणांसाठी बाह्यरुग्ण विभागात आला होता. हा रुग्ण मूळचा नाशिकचा असून, दि. 6 नोव्हेंबर तो पुण्यात आला होता. त्यापूर्वी हा रुग्ण सुरतला जाऊन आला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
परिसरात सर्वेक्षण
महापालिकेच्या वतीने बावधन भागात रोग नियंत्रण उपाययोजना केल्या आहेत. रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. या भागात डासोत्पत्तीसाठी घरोघर सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. या भागात एडीस डासाची उत्पत्ती आढळून आलेली नाही.
ही आहेत लक्षणे…
या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाही. तर अन्य रुग्णांमध्ये डोळे लाल होणे, प्रचंड डोकेदुखी, ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. ज्या लोकांना या विषाणुने ग्रासले आहे त्यांनी आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात. याची बाधा गरोदर महिलांना झाल्यास जन्माला येणाऱ्या मुलांवर त्याचा परिणाम दिसतो. यामुळे मेंदूची वाढ अपुरी होते. यामध्ये मुलांचे डोके प्रमाणापेक्षा लहान होणे, त्याला गुलियन बॅरे सिंड्रोम होणे, मज्जातंतूविषयक आजार होणे ही लक्षणे दिसू शकतात.