गुगल, फेसबुक, ऍमेझॉन, ऍपलचा अमेरिकन कॉंग्रेससमोर दावा
वाशिंग्टन – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही बड्या बहुराष्ट्रीय कंपन्या एकाधिकारशाही निर्माण करून स्पर्धा नियमाचा भंग करीत असल्याचा आरोप होत आहे. या विषयावर या बड्या कंपन्यांच्या प्रमुखाची अमेरिकन कॉंग्रेससमोर साक्ष चालू आहे. आम्ही स्पर्धा नियमाचा भंग न करता काम करीत आहोत, असे या चार बड्या कंपन्यांनी सांगितले.
फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग, ऍमेझॉनचे जेफ बेझॉस, गुगलचे सुंदर पीचाई, ऍपलचे टीम कुक यांनी सांगितले की, आम्ही अतिशय खडतर परिस्थितीत कंपन्या सुरू केल्या. प्रचंड स्पर्धा असूनही आम्ही नावीन्यपूर्ण उत्पादने सादर करून यशस्वी झालो. आम्ही लोकशाही संकेताचा कसलाही भंग करीत नाही किंवा करणार नाही. उलट आमच्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक समृद्धी वाढण्यास व लोकशाहीचे संरक्षण होण्यास मदत झाली आहे. या कंपन्या स्पर्धकांची माहिती संकलित करतात आणि त्या आधारावर स्वतःची उत्पादने विकसित करतात असा आरोप होत आला आहे. आम्ही स्पर्धा नियमाचा भंग होणार नाही याची काळजी घेतो, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ट्रम्प यांचा बड्या कंपन्यांच्या एकाधिकारशाहीला विरोध
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही साक्ष सुरू होण्यापूर्वी एक ट्विट करून कॉंग्रेस सदस्यांनी या चार मोठ्या कंपन्यांना नियंत्रणात आणावे असे आवाहन केले आहे. या चार कंपन्या एकाधिकारशाही करून इतरांना नामशेष करतात. त्यामध्ये राजकीय पक्षाचा किंवा विचारसरणीचा ही समावेश असतो. मी स्वतः त्याचा बळी आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जर कॉंग्रेस सदस्यांनी या चार कंपन्यांना वठणीवर आणले नाही तर मी स्वतः कार्यकारी आदेश काढून या चार कंपन्यांना वठणीवर आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.