नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी विविध कंपन्या लसनिर्मिती करत आहेत. दरम्यान, फायझर आणि सीरम इन्स्टिट्यूटने नुकतीच तातडीच्या वापरासाठी परवानगी मागितली आहे. आता या दोन कंपन्यानंतर भारत बायोटेकने स्वदेशी पद्धतीने विकसित ‘कोवॅक्सिन’ या लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयची (DCGI) परवानगी मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोविड -19 संसर्गावरील ‘कोविशील्ड’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगीसाठी ड्रग्स ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे अर्ज केला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनीने फायझरने फार्मास्युटिकल सेक्टरच्या नियामकाकडे अशीच परवानगी मागितली होती.
परवानगी विचारणारी फायझर ही पहिली कंपनी आहे. यासाठी युके आणि बहरीनमध्ये फायझरला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. पुणे स्थित कंपनी एसआयआयने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि फार्मा कंपनी अॅस्ट्रा जेनेकाशी लस विकसित करण्यासाठी करार केला आहे.
सध्या ही कंपनी भारतात या लसीची चाचणी घेत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या म्हणण्यानुसार, सीरम संस्थेने यापूर्वीच डीसीजीआयच्या ‘अॅट रिस्क मॅन्युफॅक्चरिंग अँड स्टॉकपाईलिंग’ परवान्याअंतर्गत या लसीचे चार कोटी डोस तयार केले आहेत.