सर्वसामान्यांची लालपरी झाली 71 वर्षांची

1 जूनला साजरा होणार वर्धापनदिन

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील खेड्या पाड्यांतून, गावांगावांतून फिरणारी लालपरी आता 71 वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा 71 वा वर्धापनदिन येत्या शनिवारी 1 जून 2019 रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सर्व 568 बसस्थानकावर साजरा केला जाणार असल्याची माहीती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे.

मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत, असेही रावते यांनी सांगितले. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे. एसटीचा हा 71 वा वर्धापनदिन राज्यातील सर्व एसटी बसस्थानकावर उत्साहात साजरा करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन आणि सत्कार संबंधित ठिकाणी करण्यात येणार असल्याचेही रावते यांनी सांगितले.

एसटीच्या मुंबईतील प्रमुख कार्यालयातही सोहळा करण्यात येणार असून यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुरूवातीला ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर आणि रामदास फुटाणे आपल्या सदाबहार काव्यसुमनांची मेजवानी उपस्थित मान्यवर आणि कर्मचारी वर्गाला देणार आहेत. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांचे अभिनंदन आणि सत्कार तसेच सेवाज्येष्ठ एसटी कर्मचारी आणि उल्लेखनीय कामगिरी करीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×