सर्वसामान्यांना इंधन मिळणार नाही? काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्या…

पेट्रोल पंपांवर गर्दीचा 'भडका'

पुणे – ‘लॉकडाऊन असूनही अनेक नागरिक विनाकारण किरकोळ कारणे देत घराबाहेर पडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्‍यक सेवांसाठीच पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे,’ अशी अफवा पसरल्याने शहरातील अनेक पंपांवर शुक्रवारी सकाळी पेट्रोलसाठी रांगा लागल्या होत्या. मात्र, अद्याप असा कोणताही आदेश नसल्याचे पंपचालक सांगत होते. तरीही नागरिक पेट्रोलसाठी गर्दी करत होते.

सध्याच्या लॉकडाऊनमध्ये सुमारे 30 बाबींना अत्यावश्‍यक सेवा म्हणून सवलत आहे. मात्र, या घटकांचे कारण करत अनेकजण घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे किराणा, भाजीपाल्याच्या नावाखाली काही महाभाग नातेवाईक, मित्रांच्या भेटीसाठी कुटुंबातील सदस्यांनाही बाहेर नेत आहेत, तर अनेकजण अत्यावश्‍यक सेवांचे कागद गाडीला चिकटवत भटकंती करत आहेत. अत्यावश्‍यक सेवांना अडचण नको म्हणून पोलीसही सामोपचाराची भूमिका घेऊन कोणालाही अडवत नसल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात आल्याने अनेकजण राजरोसपणे बाहेर पडत आहेत.

“आता शासनाकडून सर्वसामान्यांना भाजीपाला, किराणा तसेच पेट्रोल देणे बंद करण्यात येणार’ अशा बातम्या काही वेबपोर्टल तसेच सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यामुळे शासन आदेश कधीही निघेल या भीतीपोटी अनेकांनी शुक्रवारीच वाहनाच्या इंधनाची टाकी फुल करण्यासाठी पंपांवर गर्दी केली, तर किराणा दुकाने बंद होण्याच्या भीतीने तिथंही रांगा लागल्या.

ही गर्दी नेमकी कशाची?
महापालिकेने खाद्यपदार्थ, भाजीपाला, किराणा यांना परवानगी दिली आहे, तर आर्थिक बाबींशी संबंधित सर्व खासगी कार्यालये आणि शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालयांना परवानगी आहे. या कार्यालयांची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 असते, तर सर्वसाधारणपणे किराणा तसेच भाजीसाठी नागरिकही शहरात उन्हाचा चटका वाढत असल्याने सकाळी 10 पूर्वीच बाहेर पडत आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी कर्मचारी, अत्यावश्‍यक सेवाचे कर्मचारी यांची गर्दी अपेक्षित आहे. पण, शहरात दुपारी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत वर्दळ कायम आहे. त्यामुळे खरंच या वेळेत बाहेर पडलेले अत्यावश्‍यक सेवांचे कर्मचारी आहेत, की भटकण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.