सर्वसामान्य जनता माझ्याच सोबत

लोणीकंद येथील प्रचारसभेत माजी आमदार अशोक पवार यांचा विश्‍वास

कोरेगाव भीमा – माझ्यासोबत शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आहे. तर सर्व गुंड आणि दोन नंबरवाले विरोधकांच्या बाजूने एकवटले आहेत, अशी टीका शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार, माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी केली. लोणीकंद (ता. हवेली) येथील श्री म्हसोबा मंदिराच्या परिसरात झालेल्या प्रचारसभेत पवार बोलत होते.

पवार म्हणाले की, गेल्या 59 महिन्यांत आमदार पाचर्णे यांनी फक्‍त गुंडांना व 2 नंबरचे धंदे करणाऱ्या व्यक्तींनाच अभय दिले. त्यामुळेच ते लोक पाचर्णे यांच्यासोबत आहेत. आमदार पाचर्णे यांच्यावर निष्क्रियतेचा लागलेला कलंक पुसण्यासाठी ते शेवटच्या महिन्यात मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनता आमदारांचे सर्व धंदे ओळखून आहे. असा टोला यावेळी अशोक पवार यांनी आमदार पाचर्णे यांना लगावला.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्याबाबत बोलताना राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस प्रदीप वसंत कंद म्हणाले की, ज्या शरद पवारांनी राजकारणातली सर्व पदे दिली. त्यांना सोडून जाण्याचा निर्णय हवेली तालुक्‍यातील 39 गावांतील जनतेला आवडलेला नाही. सर्व जनता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत आहे. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी हवेलीमधील जनता एकवटली आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. असे कंद म्हणाले.

यावेळी हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरकाका भूमकर, डॉ. चंद्रकांत कोलते, हवेली तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, माजी सरपंच श्रीमंत झुरुंगे, अनिल होले, हवेली तालुका राष्ट्रवादीचे सरचिटणीस सोमनाथ कंद, राष्ट्रवादी युवतीच्या मोनिका झुरुंगे, हभप. हरिभाऊ झुरुंगे यांची भाषणे झाली. याप्रसंगी हवेली तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा लोचन शिवले, घोडगंगा कारखान्याचे संचालक दिलीप मोकाशी, राहुल चोरघडे, सरपंच सागर गायकवाड, ओबीसी सेलचे सुभाष टिळेकर, संदीप गोते, रुपेश कंद, अर्जुन कांचन अनिल सोनवणे, पुष्पा कंद, रुपाली भूमकर, प्रतिभा कंद, रवींद्र कंद, मृणालिनी शिंदे, प्रीती शिंदे, सुनीता खलसे, शालन शिंदे, चंद्रकांत शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार यांच्यामुळे मोठी पदे मिळाली- सोमनाथ कंद
राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस सोमनाथ कंद यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला लोणीकंद गावातून सर्वाधिक मताधिक्‍य देऊ, असे सांगितले. तसेच लोणीकंद गावाचा आजपर्यंत झालेला विकास केवळ शरद पवार यांच्यामुळे झाला आहे. त्यांनीच गावात मोठ- मोठी पदे दिली, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.