मुंबई – दुहेरी लाभाच्या पदांमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कारभारात निर्माण होणाऱ्या समस्येबाबत लवकरच श्वेतपत्रिका काढली जाणार आहे असे मंडळाच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीच्या (सीओए)सदस्या डायना एडलजी यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने दुहेरी लाभाबाबत मंडळाकडे नियमावली दिली असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांना कारणे दाखवा नोटीसही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे वादंग निर्माण झाले असून मंडळावरही टीका करण्यात आली आहे. याबाबत सन्मान्य तोडगा काढण्यासाठी सीओएने येथे माजी खेळाडूंची बैठक घेतली होती. या बैठकीस दिलिप वेंगसरकर, संजय मांजरेकर, इरफान पठाण, पार्थिव पटेल, अजित आगरकर, रोहन गावसकर आदी खेळाडू उपस्थित होते. गांगुली यांनी स्काईपद्वारे या बैठकीत भाग घेतला.
एडलजी यांनी सांगितले की, मंडळ लवकरच एक व्यक्ती एक पद हा नियम अंमलात आणणार आहे. तसेच दुहेरी लाभाबाबत सविस्तर नियमावलीही अंमलात आणणार आहे. याबाबत आजी व माजी खेळाडूंनी केलेल्या सूचनांनुसार लवकरच श्वेतपत्रिका काढली जाईल. त्यासाठी आमच्या समितीची बैठक होणार आहे. समितीचे अध्यक्ष विनोद राय हे या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.