- सामाजिक सुरक्षा पथकातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या
- अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई नाहीच
पिंपरी – पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र पोलीस निरीक्षकांनी सामाजिक सुरक्षा पथकातील कर्मचाऱ्यांबाबत तक्रार करताच सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे पोलीस आयुक्तांनी चोर सोडून संन्यालाशा फाशी दिल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांचे समूट उच्चाटन करू, असे पत्रकार परिषदेत जाहीर केले. सुरुवातीच्या काळात सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना आपल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यास सांगितले. मात्र कमाईची चटक लागलेल्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पोलीस आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या पथकाकडून दररोज अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे. सात महिन्यात या पथकाकडून पावणे दोनशे ठिकाणी छापेमारी करीत कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
दरम्यान आपल्या हद्दीत सामाजिक सुरक्षा पथक कारवाई करत असल्याने पोलीस ठाण्यातील अधिकारी दुखावले आणि पथकातील कर्मचाऱ्यांच्या विरोधात सूर उमटू लागले. एका निरीक्षकाने पथकातील कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याने या पथकातील सात कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. बदली केलेल्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात सामाजिक सुरक्षा पथकात नेमणूक केली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ कर्तव्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाने आत्तापर्यंत पावणे दोनशे कारवाया केल्या. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हे अवैध धंदे सुरू होते त्यापैकी एकाही पोलीस निरीक्षकावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कारवाई केली नाही. मात्र सततच्या कारवायांमुळे नाराज झालेल्या पोलीस निरीक्षकांनी सामाजिक सुरक्षा पथकातील कर्मचाऱ्यांबाबतच पोलीस आयुक्तांकडे तक्रार करताच सात जणांच्या बदल्या करण्यात आल्या.
बदली झालेले कर्मचारी (बदलीचे ठिकाण)
पोलीस हवालदार संदीप गवारी (भोसरी)
पोलीस नाईक दीपक साबळे (भोसरी)
पोलीस हवालदार अनंत यादव (दिघी आळंदी वाहतूक विभाग)
पोलीस हवालदार संतोष अस्वले (गुन्हे शाखा युनिट चार)
पोलीस नाईक महेश बारकुले (तळेगाव दाभाडे)
पोलीस नाईक विष्णू भारती (पिंपरी)
पोलीस शिपाई मारोतराव जाधव (चाकण वाहतूक विभाग)