नाशिक – नाशिक पोलिस विभागात दंगल नियंत्रण पथकात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी प्रतीक जाधव (वय 31) यांचे निधन झाले. पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी प्रतीक यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत पार्थिवास खांदा दिला. अधिकारी कितीही मोठा असला, तरी त्याच्या आतल्या एका कोपऱ्यात एक हळवा माणूस दडलेला असतो, याचे दर्शन यावेळी झाले.
आडगाव परिसरातील पोलिस कर्मचारी प्रतीक जाधव काही दिवसांपासून आजारी होते. त्याच्यांवर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही बातमी समजली. त्यांनी तातडीने पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या कानावर ही खबर घातली. त्यानंतर तातडीने पांडेय यांनी जाधव कुटुंबांचे घर गाठले. त्यांच्या घरातील मंडळींना दिलासा दिला.
ते स्वतः प्रतीक यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. मृत जाधव यांचे नातेवाईक सागर जाधव यांच्यासह स्वतः पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनीही पार्थिवास खांदा दिला. जाधव यांच्या जाण्याचा पोलिस आयुक्तांना चांगलाच धक्का बसला. प्रतीक यांच्या मृत्यूने साऱ्यांनाच चटका लावला. पोलिस कर्मचाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात येत होती.