विज्ञानविश्‍व: येणारं वर्ष चांद्रयानाचं

डॉ. मेघश्री दळवी

आपल्या चांद्रयान-2 मोहिमेत विक्रम लॅंडर सात सप्टेंबरला पहाटे चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणार होता. ती संधी हुकली तरी विक्रम चंद्रावर सुखरूप उतरला या बातमीने आपण भारतीयांना मोठा हुरूप आला. आणि आता आपण लक्ष केंद्रित करत आहोत चंद्राभोवती भ्रमण करणाऱ्या ऑर्बिटरवर. येतं एक वर्ष हा ऑर्बिटर चंद्राविषयी सतत नवनवी माहिती मिळवणार आहे, आणि तिच्यातून चांद्रमोहिमांना अधिक अचूक दिशा देणार आहे.

चांद्रयान-2 मध्ये तीन मॉड्यूल्स होती. त्यातले विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर प्रत्यक्ष चांद्रभूमीवरचा डेटा गोळा करणार होते. मात्र इतर महत्त्वाची उपकरणं ऑर्बिटरमध्येच आहेत, आणि ती अगदी व्यवस्थित काम करत आहेत. आपलं मिशन 95 टक्‍के यशस्वी झालं हे म्हणण्यामागे हेच कारण आहे. या मोहिमेतून येतं वर्ष भरपूर डेटा मिळणार आहे, अनेक प्रश्‍नांना उत्तरं मिळणार आहेत, आणि चंद्रावर वसाहत उभारण्यासाठी आवश्‍यक तो आधार मिळणार आहे.

ऑर्बिटरमध्ये असलेल्या उपकरणांपैकी एक आहे टेरेन मॅपिंग कॅमेरा. आपल्या 2008 मधल्या चांद्रयान-1 मध्ये जो कॅमेरा होता त्याच्या कित्येक पट रेझोल्यूशन या कॅमेऱ्याचं आहे. त्याने टिपलेल्या छायाचित्रांवरून चंद्र कसा उत्क्रांत होत गेला याची माहिती मिळणार आहे आणि चंद्राचा त्रिमित नकाशा तयार करण्यासाठी मदत होणार आहे.

ऑर्बिटरमध्ये आणखी एक हाय रेझोल्यूशन कॅमेरा आहे. लॅंडर उतरला तिथली दृश्‍यं टिपण्यासाठी. लॅंडींग व्यवस्थित झालं का, आणि रोव्हर योग्य प्रकारे वेगळा झाला का हे या कॅमेऱ्याने नोंदणार होते. आता विक्रम लॅंडर सुखरूप आहे ही बातमीदेखील याच कॅमेऱ्याच्या मदतीने मिळालेली आहे.

सोबत आहे लार्ज एरिया सॉफ्ट एक्‍सरे स्पेक्‍ट्रोमीटर. चंद्रावर कोणकोणती खनिजं मिळू शकतील याचा अंदाज हे उपकरण घेणार आहे. मॅग्नेशियम, ऍल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, टायटॅनियम, लोह, आणि सोडियम यांची खनिजं सूर्यप्रकाशात विशिष्ट प्रकारच्या क्ष-किरणांनी प्रतिसाद देतात. त्यावरून हे उपकरण या धातूंचं अस्तित्व निश्‍चित करणार आहे. पुढे चांद्रवसाहत उभारली तर ही स्थानिक खनिजं अत्यंत उपयुक्‍त ठरतील.

ड्युअल फ्रिक्‍वेन्सी सिन्थेटिक ऍपर्चर रडार हे आणखी एक अत्याधुनिक उपकरण. त्याच्या मदतीने आपण चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळच्या प्रदेशाची अधिक माहिती मिळवणार आहोत. याच प्रदेशात बर्फाच्या स्वरूपात पाणी उपलब्ध असल्याचा निष्कर्ष चांद्रयान -1 मोहिमेतून आपण काढला होता. आता या मोहिमेत आपण बर्फाचा एकूण किती साठा आहे याचा अदमास घेणार आहोत. तसंच हा बर्फाचा थर किती जाडीचा आहे आणि कशा प्रकारे पसरलेला आहे हेही निश्‍चित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सगळ्या माहितीवरून या बर्फसाठ्याचा वापर चांद्रवसाहतीत कशा प्रकारे करता येईल याची योजना आखता येईल. केवळ आपणच नव्हे तर इतर देशही या माहितीकडे डोळे लावून बसले आहेत, ते याचसाठी. म्हणून आता लक्ष आहे ते चांद्रयानाच्या येत्या वर्षाकडे!

Leave A Reply

Your email address will not be published.