मोकाट जनावरांचा सुळसुळाट

मनपाचे दुर्लक्ष : कोंडवाड्यासाठी प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत, निर्बीजीकरण केंद्रही बंद

नगर  – शहरात सध्या मोकाट जनावरांचा इतका सुळसुळाट झालेला आहे की मोकाट जनावरांच्या वावराला कोणाचा धरबंध आहे की नाही असा प्रश्‍न नागरिकांसमोर उभा रहात आहे. शहरातील कोणत्याही रस्त्याने जा तिथे मोकाट जनावरांचे जत्थे उभे नसतील तरच नवल अशी परिस्थिती सद्या अनुभवावयास येत आहे. यापरिस्थितीतून नगरकरांची अजुन महिनाभर तरी सुटका होणार नाही असेच चित्र सध्या दिसत आहे.

शहराच्या सर्व भाजीमंडई, दिल्ली दरवाजा, चौपाटी कारंजा, चितळे रस्ता, माणिक चौक, बागरोजा हाडको रस्ता, डॉ.आंबेडकर मार्ग, जुनी वसंत टॉकिज, बंगालचौक, माळीवाडा वेस, कलेक्‍टर कचेरी, स्टेट बॅंक चौक, एसपी कार्यालय चौक, सिव्हील हॉस्पिटल चौक, या रस्त्यांवर हमखास मोकाट जनावरांचे जत्थे अस्ताव्यस्त पणे उभे असतात. त्यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा तर होतोच शिवाय छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रणही मिळते.


रात्री दहा साडेदहा नंतर याच जनावरांची जागा मोकाट कुत्रे घेतांना दिसतात. एकवेळ मोकाट जनावरे परवडली अशी कुत्र्यांची तऱ्हा, एखाद्या भरधाव वाहना मागे ही कुत्री धावली की वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भांबावून सोडतात त्यातूनही अनेकदा अपघातांना निमंत्रण मिळतं.

शहरात आणि उपनगरांत कुत्र्यांनी चावे घेवून गंभीर जखमी केल्याच्या कितीतरी घटना घडल्या आहेत. नागापूर – बोल्ह्रगावात मोकाट जनावरांनी हुंदडल्याने एक मुलगी गंभीर झाल्याची घटना महिनाभरापूर्वीच घडली. अशा घटना घडल्याकी जनतेतून प्रतिक्रिया उमटते मनपाकडूनही थातूर मातूर मलमपट्टी केली जाते. पुन्हा अशी घटना जेव्हा केव्हा घडेल त्यावेळी पुन्हा पहिलेपाढे पंचावन्न अशी सध्या अवस्था पहायला मिळत आहे.

नवीन कोंडवाडा अस्तित्वात येण्यास एक महिना लागणार
याबाबत कोंडवाडा प्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या कोंडवाडाच अस्तित्वात नसल्याचे सांगितले. मुळात जिथे कोंडवाडा होता त्या जागी आता मार्केट उभे राहिले असल्याने आता कोंडवाडा नागापूर परिसरात प्रस्तावित करण्यात आला आहे. कोंढवाडा म्हटलंकी बंदिस्त परिसर हवा तेथे लाईटची सोय असली पाहिजे. पाण्याची व्यवस्था असायला हवी या सर्व गोष्टींचे प्रस्ताव दिले असून त्याचा कार्यारंभ आदेश लवकरच निघेल आणि या सर्व सोयी होण्यासाठी किमान महिनाभराचा अवधी लागणार आहे.

मोकाट जनावरांचे मालक बिनधास्त
लहान जनावरांसाठी 240 रुपये आणि मोठ्या जनावरांसाठी 710 अशी दंडात्मक रक्कम प्रत्येक जनावराच्या मालकाला भरावी लागते मात्र सध्या कोंडवाडाच नसल्याने जनावरांचे मालक या जनावरांबाबत अधिकच बिनधास्त झालेले दिसतात. तर शहरातील पांजरापोळ सारख्या संसंस्थामोकाट जनावरे घेत नसल्याने मनपाची पंचायत झाली आहे.

पाण्याअभावी निर्बीजीकरण केंद्र बंद
मोकाट कुत्र्यांच्या बाबतीतही तीच अवस्था असून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र पिंपळगाव माळवी येथे उघडण्यात आले असून तेथे पाणी नसल्याने तेही सध्या बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती कोंडवाडा प्रमुख यू. जी. म्हसे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)