पुणे – मागील दोन दिवसांपासून तापमान घट झाली असून, ठिकठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. तर पुढील दोन दिवसदेखील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ईशान्य मध्यप्रदेश आणि लगतच्या भागावर असलेल्या चक्रीय चक्रवातापासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. मागील 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
मागील 24 तासांत राज्यात सर्वात कमी तापमान ब्रह्मपुरी येथे 11.2 अंश सेल्सिअस नोंदविले आहे. शुक्रवारी पुणे येथे 30.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 12.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. लोहगाव येथे 31.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 13.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान, पाषाण-30.2, 13.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले आहे.