सततच्या पावसामुळे नारळाचा दर्जा खालावला

आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात मोठे नुकसान : महाराष्ट्रावर परिणाम

पुणे – लांबलेल्या पावसाचा फटका नारळाला बसला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात नारळाचा दर्जा खालावला आहे. तरीही, दुसरीकडे मागणी घटली असली तरीही निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे नारळाच्या भावात शेकड्यामागे 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे.

नारळाचा नवीन हंगाम सुरू होण्यास अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. मार्केटयार्डात सध्या आवक होणाऱ्या नारळाचा आकार लहान आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेशात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नारळाचा दर्जा खालावला आहे. तर, कर्नाटक येथून होणारी आवक घटली अहे. त्यामुळे भाव वाढल्याचे नारळाचे व्यापारी आणि दी पुना मर्चंटस चेंबरचे माजी अध्यक्ष दीपक बोरा यांनी दिली.

सध्या मार्केटयार्डात नारळाची अत्यल्प आवक होत आहे. दररोज तीन ते पाच गाड्यांची म्हणजेच 1 ते दीड हजार पोत्यांची आवक होत आहे. एका पोत्यामध्ये जवळपास शंभर नारळ असतात. दिवाळीपूर्वी दररोज तीन हजार पोत्यांची आवक होत होती. एकंदरीतच ही आवक निम्म्याने घटली आहे. तसेच मागणीही निम्म्याने घटली आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. डिसेंबरमध्ये दत्तजयंती आणि नाताळाचा सण असल्याने मागणी चांगली राहील, तसेच नवीन नारळाची आवक महाशिवरात्री दरम्यान म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. तसेच त्यानंतर नारळाचा दर्जाही सुधारणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.

Leave A Reply

Your email address will not be published.