उंडाळे – येरवळे ता. कराड येथील जुने गावठाण येथे सुमारे 25 ते 30 अंड्यांसह कोब्रा नाग गुरुवारी आढळून आला. याची माहिती मिळाल्यावर सर्वमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांनी या नागाला अंड्यांसह पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले. पकडलेला कोब्रा पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी, येरवळे येथे जुने गावठाणमध्ये महादेव यादव यांचा स्वप्नपूर्ती नावाचा बंगला आहे. या बंगल्याचा पाठीमाच्या भिंतीजवळ गुरुवारी दुपारच्या सुमारास बिळामध्ये कोब्रा नाग आढळून आला. तसेच त्याची सुमारे 25 ते 30 अंडीही याठिकाणी आढळून आली. त्यानंतर महादेव यादव यांनी तात्काळ सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांना त्याबाबत माहिती दिली.
सर्वमित्रांनी तात्काळ घटनस्थळी धाव घेत बिळात असलेल्या कोब्राला तब्बल एक तास अथक परिश्रम करुन सुरक्षितपणे पकडले. तसेच त्याची अंडी व कोब्रा सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर त्याला अंड्यांसह शिंदेवाडी येथील डोंगरात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.कोब्रा गेली दहा त बारा दिवस महादेव यादव यांच्या घराजवळ वास्तव्यास होता.
तसेच तो त्यांच्या कुटुंबियांच्या नजरेसही पडत होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. मात्र, सर्पमित्रांनी हा कोब्रा पकडून डोंगरात सोडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबद्दल महादेव यादव यांनी सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांचे आभार मानले.
===============