बंद जलवाहिनीवरून युतीची दुटप्पी भूमिका

पिंपरी – पवना बंद जलवाहिनीचे रखडलेले काम पिंपरी-चिंचवडकरांना चोविस तास पाणी पुरवठा करण्याच्या योजनेत मोठा अडथळा ठरणार आहे. एकीकडे पिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्यावर संक्रांत आली असताना दुसरीकडे मावळातील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध कायम आहे. शहरवासियांना पाणीपुरवठा करण्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला भाजपने खोडा घातला. भाजपची दुटप्पी भूमिका आजही कायम आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एक आणि मावळात दुसरी सोयीस्कर भूमिका युतीच्या नेत्यांनी आजपर्यंत घेतली. बंद पाईपलाईनच्या पाण्याचे राजकारण या लोकसभा निवडणुकीत युतीला भोवण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला चोविस तास पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने तात्कालीन सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने बंद पाणीपुरवठा योजना हाती घेतली होती. पवना धरणातून थेट रावेत येथील बंधाऱ्यात बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याच्या योजनेला मंजुरी देवून हे कामही सुरू करण्यात आले होते. या योजनेचे भूमिपूजन 1 मे 2008 साली तात्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र योजनेला मावळातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. सातत्याने भूसंपादनला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी 9 ऑगष्ट 2011 साली केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मोरेश्‍वर सोपान साठे, कांताबाई अंकुश ठाकर आणि शामराव बापू तुपे या तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या आंदोलनानंतर ही योजना अद्‌यापर्यंत स्थगीत आहे.

पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या योजनेवर शिवसेना आणि भाजपाने नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली. पिंपरी-चिंचवड शहरात भाषणबाजी करताना ही योजना महत्त्वाचे असल्याचे सांगतानाच मावळातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात मात्र या योजनेला विरोध दर्शविला. आजपर्यंत या दोन्ही पक्षांनी कधीच स्पष्ट भूमिका न घेतल्याने सध्या शहरवासियांना पाण्याचा होत असलेला त्रास हा यापुढे अधिकच तीव्र होत जाणार आहे. श्रीरंग बारणे यांनी गेल्या पाच वर्षांत या योजनेचा तिढा सोडविण्यासाठी कोणतीच पावले न उचलल्याने आजही ही
योजना अधांतरी आहे.

मतांच्या राजकारणासाठी शिवसेना भाजपाच्या नेत्यांनी घेतलेली दुटप्पी भूमिका शहरवासियांच्या पाणीप्रश्‍नामध्ये भर घालणारी ठरली आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्ता असतानाही युतीच्या नेत्यांना तसेच खासदार बारणे यांना हा प्रश्‍न सोडविण्यात यश न आल्यामुळे तसेच दुटप्पी भूमिका घेतल्याचा फटका शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बसण्याची शक्‍यता आहे.

बारणे यांनी भूमिका जाहीर करावी

बंद जलवाहिनीचा प्रश्‍न शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत सोडविलेला नाही. तसेच मावळात आणि पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळी भूमिका घेतली आहे. या योजनेचे काम अवघे दहा टक्के झाले असताना 398 पैकी 142 कोटी रुपये महापालिकेने ठेकेदाराला अदा केले आहेत. महापालिकेने या योजनेवर खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्यात जाण्याची भीती आहे. आंद्रा, भामाआसखेड मधून पाणी आरक्षणाचा प्रश्‍नही अधांतरी आहे. पवना बंद जलवाहिनीबाबत तोडगा काढण्यासाठी कोणीही पुढे यायला तयार नाही. युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बंद जलवाहिनीबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शहरवासियांच्या वतीने होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.