ढगाळ वातावरण, थंडीच्या कडाक्‍याने सातारकर गारठले

सातारा – अरबी समुद्रावरील वातावरणात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या बदलांमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील दोन-तीन दिवसांमध्ये राज्यात जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे साताऱ्यात मंगळवारी ढगाळ वातावरण तयार होऊन हवेत अचानक गारवा निर्माण झाला होता. या थंडीच्या कडाक्‍यामुळे नागरिक गारठले होते. त्याचबरोबर खराब हवामानामुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील जनतेने पावसाळ्यात अतिवृष्टी, महापूर अनुभवले. त्यानंतर परतीच्या मान्सूनमुळेही जवळपास संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडला होता. पावसाळा संपून दोन महिने झाले तरी अधूनमधून पाऊस, ढगाळ हवामानाने जनतेचा पिच्छा पुरवला होता. आता नोव्हेंबर महिना संपल्यानंतर तरी किमान यातून सुटका होईल, असे वाटत असतानाच सोमवारी रात्रीपासून साताऱ्यात हवामान ढगाळ झाले होते. त्यामुळे सोमवारी रात्री पाऊस पडला. मंगळवारी दुपारपर्यंत हे ढगाळ हवामान कायम होते. दुपारनंतर थोडे ऊन पडले तरी हवेतील गारठा कायम होता.

जून महिन्यापासून डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत नागरिकांना ढगाळ व खराब हवामानाची जणू सवयच झाली आहे. परिणामी साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली होती. स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. नोव्हेंबरमध्ये हवामान बऱ्यापैकी स्वच्छ होते; परंतु कालपासून हवामानात पुन्हा बदल झाला. जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान होते. त्यातच थंडीचाही कडाका वाढला. हवामानात अचानक झालेल्या या बदलामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्या दोन दिवसात थोडी घटली होती. मॉर्निंग वॉकला बाहेर पडताना नागरिकांनी उबदार कपडे परिधान केले होते.

ढगाळ हवामानामुळे साथीचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला असून पुन्हा ते रोखण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांत सर्दी, ताप, खोकला यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या कामगारांना थंडीचा फटका बसत आहे. ग्रामीण भागात पहाटे थंड हवा व नंतर तापमान वाढत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांवर होत आहे. वाढत्या थंडीमुळे गावोगावी, चौकाचौकात शेकोट्या पेटू लागल्या असून थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे खरेदीकडे नागरिकांचा कल वाढत आहे.

हवामानातील बदल, थंडी यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. हे आजार होऊ नयेत यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालय व त्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा असून नागरिकांनी घाबरुन न जाता नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा.

– डॉ. अमोद गडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.