कपडे, वाहन चोरणारा अखेर जाळ्यात 

घरफोडीचेही गुन्हे : साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे – घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांमधून दहशत पसविणाऱ्या आरोपीच्या अखेर भारती विद्यापीठ पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या आहेत. त्याला अटक करुन त्याच्याकडे चौकशी केली असता तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच 6 लाख 62 हजारांचा माल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. जितेंद्रकुमार चम्पालाल जैन (वय 34, रा. बुसी, राजस्थान) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव असून राजेंद्रसिंग राजपुरोहित (रा.सिरोई, राजस्थान) व धोलाराम उर्फ दिलीप चौधरी (रा. बुसीगाव, राजस्थान), तेजराम (रा.मारवाड, राजस्थान) यांच्यासह इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

तपास पथकाचे अधिकारी महेंद्र पाटील व त्यांचे पथक 28 जून रोजी गस्त घालत असताना त्यांना भूमकर चौकाकडून आंबेगाव बुद्रुककडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर पांढरी मोटार थांबली असून त्या गाडीतील व्यक्तींनी चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपासणी केली असता काही अंतरावर गाडीतील एक व्यक्ती राजस्थान आरटीओ पासिंग असलेली मोटारची पाटी बदलत असल्याचे दिसले.

त्यास त्या मोटारीसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपले नाव जितेंद्रकुमार जैन असल्याचे सांगितले. तसेच आपल्या इतर तीन साथीदारांची देखील नावे सांगितली. या चौघांनी मिळून मोटारीसह दत्तनगर भागात दोन महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी एका बंद बंगल्यामध्ये चोरी, तसेच पंधरा दिवसांपूर्वी जुन्नर परिसरातून एक सॅन्ट्रो कार आणि नऱ्हे परिसरात रात्रीच्या वेळी एका कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून कपडे चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

चोरी केलेल्या कपड्यांपैकी 1लाख 12 हजाराचे कपडे, दोन मोटारींसह तीन गुन्ह्यातील एकूण 6 लाख 62 लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णु ताम्हाणे, पोलीस कर्मचारी श्रीधर पाटील, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, प्रणव सकपाळ, समीर बागसिराज यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.