घड्याळाचा गजर की धनुष्यबाण ?

आज होणार फैसला ः निकालाबाबत उत्सुकता शिगेला
पिंपरी – लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस अखेर आला आहे. मावळ आणि शिरुर या दोन्ही शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदाच कडवी झुंज दिली आहे. यामुळे या दुरंगी  लढतीत शिवसेनेची मावळमधील हॅटट्रिक आणि शिरुरमधील विजयाचा चौकार राष्ट्रवादी कॉंग्रेस रोखू शकेल का? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य 29 एप्रिल रोजी मतदान यंत्रात बंद झाले आहे. मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम बालेवाडी क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून बालेवाडी येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवार तर, शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासह 23 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतदान यंत्रातून बाहेर पडणार आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. आढळराव पाटलांना आढळराव चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. डॉ. कोल्हे इतिहास घडविणार की आढळराव विक्रम करणार याबाबतची चर्चा रंगली आहे. ऐनवेळी डॉ. कोल्हे यांचा प्रवेश घडवून आणत राष्ट्रवादीने आढळरावांना “जोर का झटका’ दिला. त्यामुळे डॉ. कोल्हेंच्या प्रवेशापूर्वी आढळरावांसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक खडतर झाली.

शेजारच्या मतदार संघात पवार घराण्यातील उमेदवार असल्याने डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराकडे पवार कुटुंबियांकडून फारसे लक्ष घातले नसले तरी डॉ. कोल्हे यांनी मतदार संघ पिंजूण काढला. त्यांना त्या-त्या भागातील स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या नेत्यांची साथ लाभली. आढळरावांचे तीन लाखांचे मताधिक्‍य मोडून काढणे डॉ. कोल्हे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. मोदी लाटेचा ओसरलेला प्रभाव, शिवसेनेची भाजपबाबतची दुतोंडी भूमिका, डॉ. कोल्हे यांचा अभिनेता म्हणून असलेला करिष्मा यामुळे आढळराव यांनाही एकेका मतासाठी दमछाक करावी लागणार आहे.

मावळ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयाचे गणित अवघड करुन ठेवले आहे. खासदार बारणे दुसऱ्यांदा विजयी झाल्यास मावळात शिवसेनेला हॅटट्रिक साधता येणार आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिल्या भाषणात झालेली फसगत, घराणेशाहीचा आरोप, प्रसिद्धीच्या नको त्या उठाठेवींमुळे नेटीझन्सकडून ट्रोल करण्यात आल्याने पार्थ पवार सुरूवातीला पिछाडीवर पडल्याचे चित्र होते. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपवाद वगळता पार्थ यांच्या प्रचारार्थ पवार कुटुंबियांनी अख्खा मतदार संघ पिंजून काढला. पार्थ पवार यांनीही शेवटच्या टप्प्यात जोर लावला. त्यामुळे खासदार बारणे यांच्यापुढेही बालेकिल्ला टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.