17 जुलैपासून दहावी, बारावी पुरवणी परीक्षा

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीसाठी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या 17 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान परीक्षा होणार आहेत.

राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागांत एकाचवेळी पुरवणी परीक्षा होणार आहे. इयत्ता दहावीची पुरवणी लेखीपरीक्षा 17 ते 30 जुलै या कालावधीत होणार आहे. बारावीची सर्वसाधारण व द्विलक्षी विषयाची परीक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 17 ते 31 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. दहावी व बारावीसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा 9 ते 16 जुलै या कालावधीत होणार आहे. विषय व दिनांकासह परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्‍त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात पाठविण्यात येणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारपासून ऑनलाइन अर्जास सुुरुवात
इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमधून नियमित शुल्कासह 14 ते 24 जूनदरम्यान ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषयक घेऊन प्रविष्ट होणाऱ्यांसाठी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना 25 ते 27 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. माध्यमिक शाळांना 28 जून ते 1 जुलैपर्यंत बॅंकेत चनलाद्वारे शुल्क भरावे लागणार आहे. विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्यासाठी शाळांना 2 जुलै ही तारीख दिली आहे, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.