बायोगॅसद्वारे पथदिवे चालवण्याचा दावा खोटा

आजपर्यंत एकही दिवा पेटला नाही : वीजेवरच चालतात

पुणे – महापालिकेच्या कचरा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसच्या सहाय्याने पथदिवे चालवले जातात, हा प्रशासनाचा दावा पूर्णपणे खोटा असून हे सगळे पथदिवे महावितरणकडून मिळणाऱ्या वीजेतूनच चालतात. एवढेच नव्हे तर निर्माण होणाऱ्या बायोगॅसचा शून्य उपयोग होत असून निर्माण झालेल्या बायोगॅसचे बलून ठेवण्याला जागाच उपलब्ध होत नसल्याने ते हवेत सोडले जाते. यामुळे प्रक्रिया प्रकल्पाच्या नावावर महापालिकेचे जे कोट्यवधी रुपये खर्च होतात ते अक्षरश: हवेत उडवले जात असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे.

महापालिकेचे 25 बायोगॅस निर्मिती प्रकल्प असून त्यातील 22 प्रकल्प कार्यान्वित आहेत. तसेच त्यातून बायोगॅस निर्मिती करून त्यातून प्रत्येकी 100 पथदिवे रोज लावले जातात, असा दावा महापालिकेच्या संबंधित विभागाने केला आहे. तर एकही पथदिवा बायोगॅसवर लावला जात नसून, महावितरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या वीजेवरच ते चालतात, असा खुलासा महापालिकेच्याच दुसऱ्या संबंधित विभागाने केला आहे.

वस्तुस्थिती पाहिली असता महापालिकेने 16 कोटी रुपये खर्चून वीजनिर्मिती प्रकल्प निर्माण केले आहेत. त्यातील बहुतांश प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. या प्रकल्पांमधून शहरातील 125 टन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लागून त्यातून फायदा मिळवणे, हा उद्देश होता. या प्रकल्पांसाठी 16 कोटी खर्च झाले आहेत. तर देखभाल दुरुस्तीवर 2 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. या प्रकल्पांची 1 जुलै 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीतील अधिकारातून मागवलेली माहिती पाहता ही बाब लक्षात येते.

वास्तविक 10 किलो ओल्या कचऱ्यापासून एक घन मीटर गॅस तयार होणे आवश्‍यक आहे. मात्र, वरील कालावधीत या सर्व 20 प्रकल्पात पाठवलेल्या कचऱ्यापासून केवळ 20 टक्‍के क्षमतेने गॅस निर्मितीचे काम झाले आहे. एक घन मीटर गॅसपासून 1.20 युनिट्‌स वीज निर्माण होते. त्याआधी पाच टनांच्या 20 प्रकल्पांमध्ये मिळून दरमहा 3 लाख 60 हजार युनिट्‌स वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे. ज्यातून पालिकेचे दरमहा 23 लाख रुपये वीजबील बचत होऊन वर्षभरात पावणेतीन कोटी रुपये वाचणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र वर्षभरात केवळ 16 टक्‍के वीजनिर्मिती झाल्याची माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. असे असतानाही या प्रक्रिया प्रकल्पातून निर्मिलेली एकही युनिट वीज पथदिव्यांसाठी वापरली जात नसल्याचे विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.

जनतेच्या डोळ्यात फेकली जातेय धूळ
16 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले आणि मेन्टेनन्ससाठी कोट्यवधी रुपये आजही द्यावे लागणारे हे प्रकल्प म्हणजे पांढरे हत्ती पोसण्यासारखे आहेत, अशी प्रतिक्रिया “सजग नागरिक मंच’च्या विवेक वेलणकर यांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले जात असल्याचे सांगून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली जात असून हे प्रकल्प पूर्णपणे फसलेले आहेत. हे महापालिका मान्य करत नसल्याचेही, वेलणकर यांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.