मनपाच्या निष्क्रियतेने नगरकरांचे आरोग्य धोक्‍यात

औषध फवारणी, फॉगिंग मशिन, धुरळणी कागदावरच 
अवघ्या 17 कर्मचाऱ्यांमुळे साडेचार लाख नगरकरांचा जीव टांगणीला

नगर – शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने जागो-जागी पाण्याचे डबके तयार झाली आहेत. त्यात शहराच्या कानाकोपऱ्यात घाण व कचऱ्याचे ढीग तसेच तुंबलेल्या गटारीमुळे डासांची पैदास वाढली आहे. या डासांमुळे नगरकरांना विविध आजाराने ग्रासले जात असून महापालिकेच्या निष्क्रीयतेमुळे आता नगरकरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. नियमित औषध फवारणी, फॉगिंग मशीन व धुरळणी करण्यात महापालिकेचे येत असल्याचा दावा फोल ठरत आहे. हे काम करण्यासाठी महापालिकेकडे केवळ 17 कर्मचारी आहे. त्यामुळे साडेचार लाख नगरकरांचा जीव टांगणीला लागला आहे.

शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अधुन-मधून पाऊस पडत असल्याने रस्त्यांची चाळण झाली असून जागो-जागी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ते चिखलमय झाले आहेत. शहराच्या विविध भागात पावसाचे पाणी तुंबले असून, खुल्या भूखंडांवर सांडपाणी साचून आहे. साफसफाईच्या कामांचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्यामुळे प्रभागांमध्ये ठिकठिकाणी घाणीचे ढीग साचले आहेत. परिणामी डासांची पैदास वाढली असून, नागरिकांना नानाविध आजारांचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. डोकेदुखी, अंगदुखी, खोकला, सर्दी व तापेने नगरकर फणफणल्याचे चित्र आहे. नगरकरांचे आरोग्य धोक्‍यात असले तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.

प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची तर वानवा असून, साचलेले पाणी व डासांमुळे नागरिक त्रस्त आहेत. पावसाळा आणि हिवाळ्यात आरोग्य विभागाने शहरात नियमीत धुरळणी आणि फवारणी करणे क्रमप्राप्त असताना या विभागाचे कर्मचारी दिवसभर असतात कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. अर्थात फवारणी व धुरळणी करण्यासाठी अवघे 17 कर्मचारी आहेत. शहराचा वाढता विस्तार पाहता व वाढती लोकसंख्या याचा विचार करता केवळ 17 कर्मचारी संपूर्ण शहरात फवारणी व धुरळणीचे काम करीत आहे. त्यामुळे औषध फवारणी, धुरळणीचे काम कागदावर आहे. ही कामे सुरू असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असला तरी शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयात विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

सध्या औषध फवारणी होत असून साथीचे रोग पसरल्यानंतर धुरळणीचे काम करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. याचा अर्थात साथीचे रोग परसल्यानंतरच महापालिका काम करणार आहे. पण हे साथीचे रोग होणार नाही म्हणून कोणतीही दक्षता महापालिकेकडून घेण्यात येत नाही. महापालिकेचे 17 प्रभाग असून एका प्रभागाचा केवळ एकच फवारणी कर्मचारी अशी अवस्था आहे. महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

आरोग्य विभागाला कर्तव्याचा विसर
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दरवर्षी विविध आजार, साथीच्या रोगांचा फैलाव होतो. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी मनपाच्या आरोग्य विभागाची आहे. संबंधित आरोग्य अधिकारी व यंत्रणेला कर्तव्याचा विसर पडल्यामुळे त्यांना कोट्यवधींचे वेतन कशासाठी अदा करायचे, असा सवाल नगरकर उपस्थित करीत आहेत.

फवारणी कोणत्या प्रभागात?
मलेरिया (हिवताप)चे डास आढळल्यास घराच्या कानाकोपऱ्यात, नाल्या, सर्व्हिस लाइन, खुले भूखंड, वाढलेली झुडपे आदी ठिकाणी फवारणी करणे क्रमप्राप्त आहे. तसेच हवेतील कीटकांचा नाश करण्यासाठी धुरळणी केली जाते. मात्र महापालिकेकडून सध्या फवारणी करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. फवारणी करणारे कर्मचारी नेमक्‍या कोणत्या प्रभागात आणि कधी फिरतात, असा सवाल उपस्थित झाला आहे.

नगरसेवक झोपेत; नगरकरांचे मरण
सांडपाणी, घाणीमुळे प्रत्येक प्रभागात डासांची पैदास वाढली असताना सर्वपक्षीय नगरसेवक झोपा काढत आहेत का, असा नागरिक उपस्थित करू लागले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून धुरळणी, फवारणीचा पत्ताच नसल्याचे नागरिक सांगतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.