पुणे – करोना आपत्तीमध्ये महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांच्या कसोटीचा काळ सुरू असताना शहरी व ग्रामीण भागात साप, मांजर, उंदीर तसेच पक्ष्यांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे आढळून येत आहे.
अवकाळी पावसामुळे भूगर्भात उकाडा वाढल्याने प्रामुख्याने विषारी, बिनविषारी साप जमिनीवर येत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्याच्या काही भागात चार ते पाच फुटांचे मृत साप रस्त्यालगतचे फिडर पिलर्स, भूमिगत वीजवाहिन्यांच्या खोदकामात, रोहित्राच्या स्ट्रक्चरवर, वीजखांबांवर आदी ठिकाणी दिसून आलेले आहेत. या सापांमुळे शॉर्टसर्किट झाल्याने वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. काही ठिकाणी दुरुस्तीची कामे करताना प्रामुख्याने फिडर पिलर्स किंवा भूमिगत वीजवाहिन्यांच्या खोदकामत जिवंत साप आढळून आलेले आहेत. अभियंता व जनमित्रांनी दुरुस्तीच्या कामांमध्ये सापांच्या अस्तित्वाची शक्यता पाहून योग्य खबरदारी घ्यावी व सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यासोबतच प्रामुख्याने ग्रामीण भागात वीजखांबांच्या टोकावर प्रामुख्याने कावळा आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराचे पक्षी बसल्याने शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाउंडमध्ये कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येतात. खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. प्राण्यांचा नाहक जीवही जातो.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेच्या परिसरात किंवा कपाऊंडमध्ये ओला व सुका कचरा टाकण्याचे टाळावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.