सतरा महिन्यात फोडली नऊ एटीएम : आरोपींना शोधण्यात पोलिसांना अपयश
पिंपरी – उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने एटीएम सेंटर आहेत. परंतु यापैकी बहुतेक एटीएम सेंटर असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. भर दिवसा देखील एटीएम फोडले जात आहे. यापूर्वीही एटीएम फोडण्यात आले, परंतु पोलिसांनी एटीएम फोडणाऱ्यांना पकडण्यात अपयश आल्याने एटीएम चोरट्यांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षारक्षक नसलेली शहरातील नऊ एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने फोडली. अशा पद्धतीने गेल्या सतरा महिन्यांत तब्बल एक कोटी 17 लाखांची रक्कम चोरीस गेली आहे. यामागे परप्रांतीय टोळी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र, अद्याप एकाही घटनेचा उलगडा झालेला नाही.
ग्राहकांच्या सोयीसाठी विविध बॅंकांची शहरात 571 एटीएम आहेत. त्यांच्या सुरक्षिततेबाबत गेल्याच आठवड्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॅंक अधिकाऱ्यांना लेखी सूचना केलेल्या आहेत. तरीही सुरक्षारक्षक नियुक्त करणे व हलक्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे वापरून एटीएम सुरक्षिततेकडे बहुतांश बॅंकांनी दुर्लक्ष केले आहे. खर्चात कपात करण्याचे धोरण असल्याचे काही बॅंक अधिकारी सांगतात. तसेच एटीएमचा विमा असल्याने सुरक्षेकडे बॅंकांकडून दुर्लक्ष केले जाते, असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. गॅस कटरने एटीएम फोडण्याच्या घटना रात्री घडलेल्या आहेत. बॅंक अधिकारी सकाळी नऊ वाजता कामावर आल्यानंतर एटीएमचा व्यवहार ऑनलाइन न दिसल्यास एटीएमची पाहणी केली जाते. त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस येतो व चोरटे पसार झालेले असतात. मात्र, काही बॅंकांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे काही गुन्हे टळल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांचे कानावर हात
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर एटीएम फोडण्याचे आठ प्रकार पिंपरी चिंचवड शहरात घडले आहेत. यापैकी एकाही गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याबाबत काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी प्रतिक्रियेसाठी फोनद्वारे संपर्क केला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देऊ नये, असे सांगत प्रतिक्रियेसाठी इतर अधिकाऱ्यांकडे बोट दाखविले. इतर अधिकाऱ्यांनीही थातुर मातूर कारण सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
एटीएम फोडण्याच्या घटना
24 जुलै 2018 – स्टेट बॅंकेचे टेल्को रस्त्यावरील एटीएम गॅसकटरने कापताना दहा लाखांची रक्कम जळाली
22 ऑगस्ट 2018 – वडमुखवाडीत एटीएम कापण्याचा प्रयत्न
1 डिसेंबर 2018 – ऍक्सिस बॅंकेचे संत तुकारामनगर येथील एटीएम फोडून दीड लाखाची रक्कम लंपास
8 डिसेंबर 2018 – एसबीआयचे रहाटणीतील एटीएम गॅस कटरने कापून 21 लाख चोरले
8 डिसेंबर 2018 – बॅंक ऑफ इंडियाचे आकुडी येथील एटीएम कापून 32 लाखांची चोरी
20 फेब्रुवारी 2019 – बॅंक ऑफ इंडियाचे पिंपळे गुरव येथील एटीएम कापून सहा लाख 75 हजार 700 रुपये चोरीस
16 मार्च 2019 – एसबीआयचे भोसरीतील धावडे वस्ती येथील दोन एटीएम कापून 35 लाख चोरले
5 नोव्हेंबर 2019 – प्राधिकरणातील एसबीआय बॅंकेचे एटीएम फोडले
11 नोव्हेंबर 2019 – नेवाळेवस्ती, चिखली येथील एटीएम कापून 11 लाख लुटले