जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 100 एमएलडीने वाढविणार
महापालिका सभागृहाची मंजुरी : रावेत व निगडी येथील केंद्राचा समावेश
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा 7 हजार 250 ऐवजी 9 हजार केव्हीएमने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्रातून 490 ते 495 एमएलडीऐवजी 600 एमएलडी पाणी उपसा करता येणार आहे. परिणामी, शहराला अधिकचे पाणी मिळणार आहे. या प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेने सोमवारी (दि.20) मंजुरी दिली. तसेच अतिरिक्त पाणी उपसासाठी दंड भरण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दर्शविली आहे.
पवना नदीतून रावेत बंधारा येथील महापालिकेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून दररोज 490 ते 495 एमएलडी पाणी उचलले जाते. केंद्राची तसेच, वीजेची क्षमता कमी असल्याने पवना नदीतून अधिकचे पाणी उचलले जात नसल्याने शहरातील काही भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अंतर्गत केंद्राच्या वीजपुरवठा क्षमतेत वाढ केली जाणार आहे.
रावेत केंद्राच्या टप्पा क्रमांक 1, 2, 3 व 4 अंतर्गत प्रतिदिन एकूण 490 ते 495 एमएलडी इतका नदीतून पाणी उपसा केला जातो. केंद्रासाठी महापारेषणच्या रहाटणी व चिंचवड वीज उपकेंद्रातून 22 किलो व्हॅट एक्सप्रेस फीडरद्वारे उच्चदाब वीजपुरवठा केला जातो. केंद्रासाठी महावितरण कंपनीकडून 7 हजार 250 के.व्ही.ए. वीजपुरवठा मंजूर आहे.
शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता केंद्रातून दररोज 600 एमएलडी पाणी उपसा करणे आवश्यक आहे. त्याकरीता केंद्रासाठी 7 हजार 250 ऐवजी 9 हजार केव्हीए वीजपुरवठा आवश्यक आहे. त्यानुसार महापालिकेने महावितरणकडे वाढीव वीजपुरवठ्याची मागणी केली होती. त्यास महावितरणने 27 डिसेंबर 2019 ला मंजुरी दिली आहे. त्यासाठी 36 लाख 75 हजार 617 रूपये शुल्क अदा करण्यास महावितरणने कळविले आहे. त्या खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि.15) मंजुरी दिली आहे.
जलशुद्धीकरण व अशुद्ध उपसा केंद्रातील यंत्रांची क्षमताही वाढविणार
रावेत अशुद्ध जल उपसा केंद्र आणि निगडी, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी तेथील यंत्रणेत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे आताची 500 एमएलडीची क्षमता 100 ने वाढून दररोज 600 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. या कामासाठी डीआरए कन्सल्टंट या सल्लागार एजन्सीच्या नियुक्तीस स्थायी समितीने 8 जानेवारीला मान्यता दिली आहे.
नदीत अतिरिक्त पाणी असताना रावेत बंधाऱ्यातून पाणी उचलले जाणार आहे. मंजूर 428 एमएलडीपेक्षा अधिक पाणी उपसा करण्यासाठी महापालिका दंड भरणार आहे.
– मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग