भाजपाने पाच वर्षांत विकास केल्यानेच पुन्हा महाजनादेश मिळाला : दिलीप गांधी
नगर – भाजपाच्या नेतृत्वाखालील देशातील व राज्यातील सरकारने गेल्या 5 वर्षांत विकास केल्यानेच पुन्हा एकदा जनतेने भाजपाला महाजनादेश दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्याने सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे,असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी केले.
भाजपचे राष्ट्रीय, प्रदेश, जिल्हा व शहराध्यक्षांच्या निवडणूक कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. गांधी यांनी पुढाकार घेऊन नगर शहरातील बुथ रचनेस सुरुवात केली आहे. नगर शहरामधील मध्यनगर, भिंगार मंडलांच्या बैठका घेऊन नवीन बुथ रचनेस सुरुवात केली असून, बुथ पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जात आहेत.
बारा कोटींहून अधिक सदस्य असलेल्या भाजपाच्या विजयांमध्ये पदाधिकाऱ्यांइतकेच बुथ अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे बहुमोल योगदान आहे.
लोकशाही पद्धतीने भाजपा पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. त्याची सुरुवात झाली असून, शहरातील बुथ रचनेचे काम हाती घेण्यात आलेले आहे. पक्ष संघटना बुथ रचनेवरच उभी आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण नगर शहराची बुथ रचना होणार आहे. शहरात 289 बुथ असतील. नव्या बुथ अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या, मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या होणार आहेत.
बुथ अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मनापासून पक्षाचे काम केल्यास त्यांच्या कामाची दखल पक्ष घेतच असतो. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते भविष्यात मोठे पदाधिकारी होतात, असे मत गांधी यांनी व्यक्त केले. मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी व भिंगार मंडल अध्यक्ष शिवाजी दहिंडे यांच्या उपस्थितीत गांधी यांनी बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या करुन नुतन अध्यक्षांचा सत्कारही केला. यावेळी संघटन सरचिटणीस किशोर बोरा, ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, मध्यनगर उपाध्यक्ष प्रशांत मुथा, वसंत राठोड, अजय चितळे, चेतन जग्गी आदिंसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक यावेळी उपस्थित होते.