कराड – काही दिवसांपूर्वी सूर्यवंशी मळा येथील रस्त्यामध्ये भुयारी गटार योजनेसाठी काढलेल्या खड्ड्यात आपल्या दुचाकी वाहनासह पडून येथील मंगळवार पेठेतील विजय शिंदे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी तातडीने पालिकेच्या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांची बैठक घेतली. तसेच भुयारी गटार योजनेचे ठेकेदार राठोड यांना नगराध्यक्षांनी फैलावर घेत झालेल्या दुर्घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
सदरच्या घटनेनंतर त्या ठिकाणची संपूर्ण पाहणी नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी केली. तसेच विजय शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या सर्व प्रसंगानंतर नगराध्यक्षांनी तसेच हे काम करणाऱ्या कंपनीच्या वरिष्ठांशी बोलून शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत लवकरात लवकर देणे बाबत योग्य ती कारवाई करण्याची सूचना केली.
यावेळी उपस्थित सर्व ठेकेदारांना नगराध्यक्ष म्हणाल्या, शहरात तसेच वाढीव भागांमध्ये ड्रेनेज व पाण्याच्या बाबतीत कोणत्याही तक्रारी आल्यानंतर ते काम करणारे ठेकेदार यांनी कामाच्या ठिकाणी रस्ते किंवा इतर ठिकाणी खुदाई करतात, मोठमोठे खड्डे काढले जातात. त्या ठिकाणी संबंधितांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. हाती घेतलेले काम तातडीने पूर्ण करुन सदर खड्डे लगेच मुजविले गेले पाहिजेत.
पहिले काम पूर्ण झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराने दुसऱ्या ठिकाणी काम करू नये तसेच सदरचे काम लवकर पूर्ण होणार नसेल तर त्या ठिकाणची जागा सुरक्षित करण्यात यावी. नागरिकांना त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी अधिकारी व ठेकेदारांना केल्या. या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही सुनावले.