पुणे (प्रभात वृत्तसेवा) – पुणे शहरातील करोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेता हा प्रसार आता कम्युनिटी ट्रान्सफरच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे महापालिका क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. दि. 19 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केले आहे. हे आदेश दि. 27 एप्रिलपर्यंत लागू असतील.
या आदेशानुसार, पुणे शहराच्या सर्व सीमा सील करण्यात येत आहेत. शहरातून बाहेर पडणारे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने बाहेरील व्यक्तीलाही या भागात प्रवेशबंदी असणार आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, दि. 20 एप्रिलनंतर देशाच्या काही भागातील लॉकडाऊन निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यातून पुणे महापालिका हद्दीतील विविध आस्थापनांना आणि उद्योगांना सवलती उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी नागरिकांचा वावर वाढून रुग्णांची संख्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, हा धोका लक्षात घेऊन ही उपाययोजना लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने दि.17 एप्रिल रोजी जो आदेश जारी केला, त्यात करोनाचा उद्रेक झालेल्या भागात कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आला आहे. या अधिकाराअंतर्गंत आयुक्तांनी रविवारी रात्री ही नवीन उपाययोजना जारी केली.