मलकापूर शहर झाले करोनामुक्‍त 

सर्व 26 रुग्ण सुखरूप घरी परतले; मुंबईतील स्थलांतरीत चौघेही करोनामुक्‍त 

कराड  – कराड तालुक्‍यात वनवासमाची गावानंतर सातारा जिल्ह्यात मलकापूर शहर करोनाचा हॉटस्पॉट ठरले होते. मलकापूर नगरपालिका, जिल्हा व तालुका प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर मलकापूर शहर करोनामुक्‍त झाले आहे. दि. 26 मे रोजी मलकापूर शहरातील शेवटचा करोनाबाधित रूग्ण सुखरूप घरी परतला. त्यामुळे मलकापूर वासीयांनी निःश्‍वास सोडला. मलकापुरात आढळून आलेले सर्व 26 करोनाबाधित सुखरूप घरी परतले असून त्यांच्याबरोबर मुंबईस्थित असणारे चार जणही करोनामुक्‍त झाले आहेत.

मलकापूर शहरामध्ये दि.21 एप्रिल, 2020 नंतर आगाशिवनगर, अहिल्यानगर व विश्रामनगर या भागामध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून आले. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्रादुर्भाव झाल्यामुळे शहरामध्ये करोना बाधितांची संख्या 26 इतकी झाली होती. ही करोनाची साखळी खंडीत होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली होती. त्यामुळे कराड तालुक्‍यातील करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वनावासमाची गावाबरोबर मलकापूर शहराचेही नाव जोडले जाऊ लागले.

मलकापूर पालिका क्षेत्रात सुमारे 36 हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे प्रशासनही हादरून गेले. करोनाची साखळी खंडीत करण्यात अपयश आलेतर शहराचे मोठे नुकसान होणार अशी शक्‍यता वर्तवली जात होती. त्यात भरीत भर म्हणजे मलकापूरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तसेच ढेबेवाडी विभागात जाण्याचा प्रमुख मार्ग असल्याने पुण्या-मुंबईवरून चोरून व पास काढून आलेल्या लोकांची भर पडत होती. त्यामुळे मलकापूर पालिका, आरोग्य व पोलीस यंत्रणेवर ताण आला.

यादरम्यान मलकापूर शहराला आयुक्‍त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी रुग्ण आढळून आलेल्या भागास भेट दिली होती. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मलकापूर नगरपालिकेचे कर्मचारी, आरोग्य व अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक असे 104 कर्मचाऱ्यांची टीम तयार केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषद यांनी तपासणीसाठी प्रत्येकी 104 थर्मलस्क्रिनिंग गन व ऑक्‍सिपल्स मीटर उपलब्ध करुन दिले होते. याद्वारे शहरामध्ये आरोग्य विषयक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात सर्व्हेक्षण व स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्या सुचनेनुसार भिलवाडा पॅटर्न शहरात राबवण्यात आला. मलकापूर शहरामधील सर्व करोनाबाधित रुग्ण बरे होऊन टप्प्या टप्प्याने घरी परतले आहेत. यापैकी शेवटचा रुग्ण दि. 26 मे 2020 रोजी घरी परतला आहे.

सध्या मलकापूर नगरपालिका कार्यक्षेत्रामधील मूळ मलकापूर निवासी करोनामुक्त झाले आहेत. ढेबेवाडी फाटा येथे करोनाबाधित रुग्ण आढळलेले हे रुग्ण मूळ बाचोली, ता. पाटण गावचे रहिवाशी असून मुंबईहून मलकापूर येथे आले होते. तसेच साई हाईट्‌स येथील करोनाबाधित रुग्ण हे मूळ खळे, ता. पाटण या गावची असून ते कुटुंब घाटकोपर, मुंबई येथून मलकापूर येथे आले होते. त्यांना शासनाच्या संगणक प्रणालीद्वारे प्रवास करण्यासाठी पास दिलेले आहेत. ते पास बाचोली व खळे, ता. पाटण येथील असलेतरी त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्‍य झाले आहे. दि. 31 मेपर्यंत 336 व्यक्ती मुंबई, पुणे, ठाणे व इतर शहरातून आलेल्या आहेत. या सर्व व्यक्तींना घरामध्ये स्वतंत्ररित्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले असल्याचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले.

वृद्ध व बालकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण
शहरामधील 60 वर्षावरील 2713 वयोवृध्द व 10 वर्षाआतील 3615 बालकांचा सर्व्हे सोमवार, दि. 1 जूनपासून सुरू करण्यात आला आहे. यामध्ये रक्तदाब, ह्रदयरोग, मधुमेह, अस्थमा, क्षयरोग, मुत्रपिंड विकार, लठ्ठपणा, कर्करोग व गर्भवती स्त्रिया यांना विशेष मेडिकल सुविधा देण्यात येणार आहेत.

मलकापूर करोनामुक्त झाले आहे, हे केवळ नागरिकांच्या लोकसहभागामुळे याकामी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला बालकल्याण सभापती आनंदी शिंदे, महिला बालकल्याण उपसभापती कमल कुराडे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिवाय जिल्हा व तालुका प्रशासनासह पोलीस प्रशासनाने करोनामुक्‍तीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
नीलम येडगे, नगराध्यक्षा मलकापूर 

मलकापूर नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नामुळे मलकापूर शहर करोनामुक्‍त झाले आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आयुक्‍त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्या मार्गदर्शनामुळे मलकापूर करोनामुक्‍त करण्यात आम्हाला यश आले आहे.
मनोहर शिंदे, उपनगराध्यक्ष मलकापूर 

Leave A Reply

Your email address will not be published.