सायकल चालवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश
पुणे – पुणे शहराची एकेकाळी सायकलींचे शहर अशी ओळख होती. पुन्हा ती ओळख पुनरुज्जीवित व्हावी, यासाठी महापालिकेच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी व्यक्त केले.
शनिवारवाडा ते पुणे महापालिका मुख्य भवनापर्यंत महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी सायकल चालवून पर्यावरण संतुलनाचा संदेश दिला. यावेळी सुरेश परदेशी, मंगेश दीघे आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही महापालिका भवनापर्यंत सायकल चालवली.
नागरिकांकडून सायकलींच्या वापरात वाढ व्हावी, आणि सायकल चालवण्याविषयी प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी महापालिकेत सायकल क्लब सुरू करण्यात आला आहे. सायकल क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. सायकल वापरात वाढ व्हावी, त्या दृष्टीने अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकचे काम सुरू आहे. पुण्याचे पर्यावरण संतुलन आणि आरोग्यदायी वातावरणात वाढ होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रदूषणमुक्त पुणे शहर करण्यासाठी मनपाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. प्रदूषणमुक्त पुणे शहर करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सायकल चालवावी
– सरस्वती शेंडगे, उपमहापौर.