जन्म-मृत्यू कार्यालयात घाणीचे साम्राज्य
पुणे – कसबा पेठेत जुना बाजाराजवळ महापालिकेचे जन्म-मृत्यू विभागाचे मुख्य कार्यालय आहे. आरोग्य विभागाच्या अखत्यारीत हे कार्यालय येत असून त्यातील काही भाग क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे. या ठिकाणी दररोज नागरिकांचा राबता असतो. तसेच मुख्य रस्त्याच्या कडेलाच ही इमारत आहे. मात्र, गेल्या महिन्यांपासून या कार्यालयाची नियमित स्वच्छता होत नाही.
विशेषत: इमारतीच्या आत प्रवेश करताच परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा तसेच चिखल साचलेला असून भिंतीवर गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्या आहेत. त्यामुळे आत जाताच नागरिकांना आपण पालिकेच्या कार्यालयात आहोत की कचरा डेपोमध्ये असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
या अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरली असून डासांची संख्याही वाढली आहे. परिणामी, या ठिकाणी दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना या घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मी गेल्या काही दिवसांपासून येथे दाखला घेण्यासाठी येत आहे. मात्र, या भागात कधीच स्वच्छता केलेली दिसत नाही. पावसाळ्यात तर या ठिकाणी घाण वास येतो. अनेकदा या वासामुळे अथवा घाणीमुळे या ठिकाणी थांबणेही शक्य होत नाही. ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, “हे आमचे काम नाही, पालिकेत जाऊन तक्रार करा’ असे आम्हालाच सुनावले जाते. तर आमचे काम असल्याने आम्ही तक्रार केल्यास आम्हालाच अडचण होईल.
– एक पुणेकर