नगर -जिल्हा शासकीय रुग्णालयातून अंत्यसंस्कारासाठी नेत असलेला एक मृतदेह काल सायंकाळी रुग्णवाहिकेतून खाली कोसळला अन् स्ट्रेचरसह रस्त्यावर धावला. संपूर्ण प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग केलेला असला, तरी तो पॉझिटिव्ह रुग्णाचा असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अत्यंत हलगर्जीपणे सुरू असलेल्या या गैरकारभाराचा नमुना नगरकांना उघड्या डोळ्यांनी रस्त्यावर पाहण्याचे दुर्भाग्यही काल लाभले.
काल सायंकाळी पाचच्या सुुमारास हा मृतदेह रुग्णवाहिकेतून अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी नेला जात होता. मात्र, लालटाकी रस्त्यावर रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडल्याचे तो स्ट्रेचरसह रस्त्यावर धावायला लागला. त्यामुळे त्या रुग्णवाहिकेच्या पाठिमागून धावणाऱ्या दुचाकी व चारचाकी चालकांचीही तारांबळ उडाली. धावणारे स्ट्रेचर मोडले अन् मृतदेह रस्त्यावर खाली पडला.
दरम्यान, ही बाब चालकाच्या तेथे लक्षात आली नाही. थेट लालटाकीकडे वळण घेतल्यानंतरच चालकाच्या ही गंभीर घटना लक्षात आली. तेथून त्याने मागे येऊन सहकाऱ्यांसह पुन्हा तो मृतदेह विनास्ट्रेचर रुग्णवाहिकेत टाकला व अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेला. मात्र, त्याच रुग्णासाठी वापरलेले परंतु मोडलेले ते स्ट्रेचर अनेक तास रस्त्यावर पडून होते. करोनाबाधित मृतदेहांवर लवकर अंत्यसंस्कार केले जात नसल्याची तक्रार कालच एका महिलेने केली होती.
करोनामुळे मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा मृतदेह दुसऱ्या रुग्णाशेजारी अनेक तास तसाच पडून होता. संबंधित महिला रुग्णाने आक्षेप घेतल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. या संदर्भात त्या महिलेने व्हिडिओ चित्रीकरण सुरू केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने धावपळ करत पुढील कार्यवाही पूर्ण केली होती. आज मृतदेहच रस्त्यावर पडल्याने रुग्णालयाबाहेर देखील गलथान कारभाराने प्रदर्शन झाल्याची भावना नगरकरांनी व्यक्त केली.
महापालिका व रुग्णालयात जबाबदारीवरुन तू-तू, मै-मै..!
करोना विषाणूमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना महापालिकेची यंत्रणा व जिल्हा शासकीय रुग्णालयात जबाबदारीवरुन “तू-तू, मै-मै’ सुरू आहे. मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे रुग्णालय सांगते. दुसरीकडे झालेल्या मृत्यूची माहितीच वेळेवर दिली जात नसल्याचा दावा महापालिका करते. त्यामुळे अनेक तास मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असतात.
रुग्णवाहिकेतून काल सायंकाळी रस्त्यावर पडलेला मृतदेह पॉझिटिव्ह रुग्णाचा नव्हताच. नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून अंत्यविधीसाठी एक बेवारस मृतदेह त्या रुग्णवाहिकेमधून नेला जात होता. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पडल्यानंतर त्या रुग्णवाहिकेचा दरवाजा अचानक उघडला गेला. त्यामुळे तो मृतदेह स्ट्रेचरसह रुग्णवाहिकेतून खाली पडला. हा केवळ एक अपघात आहे. तथापि, मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ज्या ठेकेदार एजन्सीला देण्यात आली आहे, त्यांना शो-कॉज नोटीस बजावणार आहे. कोविडमुळे मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी सध्या कोणी पुढे येत नाही. त्यात हे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात.
डॉ. अनिल बोरगे
आरोग्याधिकारी, महानगरपालिका, अहमदनगर.