पुणे -एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शहर आणि जिल्ह्यात रविवारी सायंकाळी जोरदार पावसाने धुवून काढले. यात कोथरूड, डेक्कन, वारजे, कात्रज, हडपसर, येरवडा आणि सिंहगड भागात पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली.
दि. 1 ऑक्टोबरला शहरासह जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील जुन्नर, भोर, मुळशी, मावळ, आंबेगाव, खेड, वेल्हा, पुरंदर या तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून सावरतो न सावरतो, तोच पावसाने पुन्हा झोडपून काढले.
रविवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण होते. मात्र, सायंकाळी सहानंतर शहर आणि उपनगरांत जोरदार पावसाने सुरुवात केली. त्यात अरुंद रस्ते आणि खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी पाणी साचले. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. औंध भागात सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत होती. पुणे शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हा पाऊस ढगफुटीसारखा पडू शकतो.
पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा
परतीचा पाऊस गेला, तरीही मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुढील 48 तासांत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर दि. 6 आणि 7 नोव्हेंबरला शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.