म्युच्युअल फंडांची बँकिंग आणि वित्त क्षेत्राला पसंती

सिक्युरिटीज् अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) जारी केलेल्या माहितीनुसार मे महिन्यात म्युच्युअल फंडांनी बँकांचे शेअर करण्याला मोठी पसंती दिली आहे. बँकिंग व्यवसायात चांगल्या वाढीची अपेक्षा, नफा वाढण्याची चिन्हे यामुळे म्युच्युअल फंडांकडून बँकिंग क्षेत्राला पसंती मिळत आहे.

व्यवस्थापनाखाली असलेली संपत्तीचा (असेट अंडर मॅनेजमेंट – एयूएम) विचार करता इक्विटीतील गुंतवणुकीपैकी 24.46 टक्के गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात करण्यात आली आहे. सगळ्या क्षेत्रांचा विचार करता बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक सर्वाधिक आहे. त्यानंतर क्रम लागतो तो वित्त (फायनान्शियल) क्षेत्राचा.

मे महिन्यात 43 म्युच्युअल फंडांनी 2,74,724 कोटी रुपये बँकांच्या शेअरमध्ये गुंतवले आहेत. एप्रिल महिन्यात ही रक्कम 2,57,757 कोटी रुपये म्हणजेच इक्विटीतील एकूण गुंतवणुकीपैकी 23.62 टक्के इतकी होती.

मे 2018 मध्ये म्युच्युअल फंडांनी बँकांच्या शेअरमध्ये 1,89,559 कोटी रुपये गुंतवले होते. बँकिंग क्षेत्राची चांगली वाढ आणि नफ्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही गुंतवणूक केली जात आहे.

बँकांपाठोपाठ वित्तीय क्षेत्राला (नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स – एनबीएफसी) फंड मॅनेजर्स पसंती देत आहेत. मे महिन्यात या क्षेत्रात 1,07,251 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्यापाठोपाठ सॉफ्टवेअर क्षेत्रात 95,367 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. पेट्रोलियम कंपन्यांमध्ये 62,065 रुपये गुंतवण्यात आले. फंड मॅनेजर्स आयटी क्षेत्राविषयी देखील आशावादी आहेत.

2019-20 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात आघाडीच्या 20 म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुंतवणुकीच्या क्षेत्रात आणि कंपन्यांमध्ये बदल केलेला दिसतो. टेलिकॉम, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सिमेंट, केमिकल या क्षेत्रांना फंड हाऊसेसकडून पसंती असल्याचे दिसत आहे. त्यात तुलनेत आरोग्य, वाहन, ग्राहकपयोगी वस्तू, धातू, तेल आणि वायू, मिडिया, तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्यातील म्युच्युअल फंडांची गुंतवणूक कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, अक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्सच्या शेअर खरेदीत म्युच्युअल फंडांकडून मे महिन्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील म्युच्युअल फंडांच्या खरेदीची या वर्षीच्या मे महिन्यातील खरेदीशी तुलना केली तर आयटीसी, इन्फोसिस, टाटा मोटर्स, अरबिंदो फार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे मूल्य घटल्याचे दिसते.

गेल्या दोन महिन्यात देशातील म्युच्युअल फंड क्षेत्रात सकारात्मक हालचाली असल्याचे दिसत  आहे. गेल्या महिन्यात देशातील म्युच्युअल फंडांकडे व्यवस्थापनासाठी असलेली संपत्ती (एयूएम) 25.9 ट्रिलियन रुपयांवर पोचली आहे. गेल्या दहा वर्षात म्युच्युअल फंडांकडील एयूएममध्ये तब्बल 3.9 पट वाढ झालेली आहे.

– चतुर

Leave A Reply

Your email address will not be published.