पुणे : कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायतमधील कचरा वेचकांच्या मुलांनी यंदाही बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळवले. या निकालावरून कोरोनाचा प्रादुर्भावाचा त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. विविध महाविद्यालयांतून कचरा वेचकांच्या एकूण 121 मुले बारावी परीक्षा दिली होती. त्यापैकी जवळपास 90 टक्क्यांहून अधिक मुले उत्तीर्ण झाले आहे.
जय आदिक सोनवणे हा 65.33 टक्के घेऊन उत्तीर्ण झाला आहे. अकबर बुलीशा माकानदर हा 65.17 टक्के, लक्ष्मी सतीश घोलप हिने 64.5 टक्के, सपना संदीपन सगत हिने 62.83 टक्के, दिशा परशुराम खंडाळे ही 62 टक्के मिळवून यश संपादन केले आहे. शिक्षण घेण्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देत या परीक्षेसाठी कचरा वेचकांच्या मुलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून यश मिळविले आहे. या मुलांना राज्य सरकार, समाज आणि शैक्षणिक संस्थांनी आज सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन, अभ्यासक्रमांची योग्य आखणी करून मदत करायला हवी, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होत आहे.