नवी दिल्ली –मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, द वॉल राहुल द्रविड व संजय बांगर या तीन स्टार खेळाडूंची पुढची पिढीही आता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत नावारूपाला येत आहे. त्यांच्या कामगिरीत राष्ट्रीय स्पर्धेतही सातत्य राहिल्यास ते लवकरच भारतीय संघ किंवा राज्य संघाचे सेकंड बेंच बनतील.
भारताचा माजी अष्टपैलू व रेल्वेचा दिग्गज खेळाडू संजय बांगरला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे यश मिळविता आले नाही. मात्र, त्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तो गेल्या वर्षी भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षकही होता. आता त्याचा मुलगा आर्यन इंग्लंडच्या लिस्टरशरमध्ये ज्युनियर क्रिकेट खेळणार आहे. आर्यनने कूच बिहार करंडक स्पर्धेत सरस कामगिरी केल्याने त्याला इंग्लंडमधील क्लबने करारबद्ध केले आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन एक अष्टपैलू म्हणून नावारूपाला येत आहे. तो भारताच्या 19 वर्षांखालील संघासह नुकताच श्रीलंकेलाही गेला होता. त्याने देशांतर्गत स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे. त्याला भारतीय संघाचा नेट गोलंदाज म्हणूनही सातत्याने संधी मिळात आहे. तो आयपीएल स्पर्धेत हीच भूमिका पार पाडण्यासाठी यंदा अमिरातीलाही गेला होता. त्याने युवा क्रिकेटमध्ये सरस कामगिरी केली असून तो कदाचित पुढील वर्षी आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळतानाही दिसू शकतो. त्याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली तर तो भारतीय संघाच्या सेकंड बेंचमध्येही स्थान मिळवू शकेल.
द वॉल या नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार व सध्याचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविड याचा मुलगा समित हा वयोगट क्रिकेट स्पर्धेत सातत्याने धावा करत आहे. त्याच्या प्रतिभेमुळे त्याला आतापासूनच द्रविडचा वारसदार म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सध्या समित बंगळुरूमध्ये कर्नाटक राज्य संघटनेकडून ज्युनियर स्तरावरील क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगलाच गाजत आहे. त्याने आगामी मोसमात प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. यातही त्याने गुणवत्ता सिद्ध केल्यास तोदेखील सेकंड बेंचमध्ये दाखल होऊ शकतो.